कोरोनाबाधित अभिनेत्री गौहर खानविरोधात गुन्हा
बाधित असूनही शुटींग, पार्ट्यामध्ये सहभागी
मुंबई : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल व्हावे, किमान विलगीकरणात राहावे, हे आता अशिक्षित मंडळींनाही समजायला लागले आहे.ग्रामीण भागातील मंडळीही कोरोनाचे नियम पाळताना दिसत आहेत. पण दुसरीकडे शहरातील सुशिक्षित लोकच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून ‘मोकाट‘ फिरताना दिसत आहेत. बॉलिवूडमधील तारा सुतारिया, मनोज वाजपेयी, आशिष विद्यार्थी, रणबीर कपूर आदी कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बॉलिवूड चिंतेत असतानाच अभिनेत्री गौहर खान ही कोरोना पॉझिटिव्ह असतानाही अनेक पार्ट्यां, शुटींगमध्ये सहभागी झाल्याचे आढळून आल्याने तिच्याविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौहर खान हिला कोरोना झाल्याचे निदान ११ मार्चरोजी झाले. पण त्यानंतरही ती अनेक सार्वजनिक ठिकाणी वावरली. चित्रिकरणात सहभागी झाली. त्यामुळे आता तेथे इतरांना तिच्यापासूनप संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. कहर म्हणजे ती कोरोनाबाधित असून बाहेर फिरत आहे, असे लक्षात आल्यावर तिला समजावण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी तिच्या घरी गेले असता साधे दार उघडण्याचे सौजन्यही तिने दाखवले नाही.त्यामुळे मुंबई पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.