...म्हणून सैफ अली खान सोशल मीडियापासून चार हात लांब!

 
मुंबई : गेल्या ३० वर्षांपासून सैफ अली खान बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. वेगवेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी सैफ ओळखला जातो. उद्या, २३ जानेवारीला त्याचा भयपट असलेल्या "भूत'चा प्रीमियर होणार आहे. यासोबतच त्याचे विक्रम वेधा आणि आदिपुरुष हे चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सैफ प्रसिद्ध अभिनेता असला तरी तो त्याचे वेगळेपण जपतो. हल्ली जवळपास सर्वच स्टार सोशल मीडियावर सक्रिय असतात. मात्र सैफ अली खान सोशल मीडियापासून स्वतःला दूरच ठेवतो.

एका मुलाखतीत त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला. जीवनाची वाटचाल कोणत्या दिशेने जातेय याचा विचार नव्या वर्षात विचार केला पाहिजे. जीवनात अडचणी येतात आणि जातातही. कोरोनाचा काळही तसाच निघून जाईल. सध्या तरी आपण आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे, असे सैफ म्हणाला. सोशल मीडियाबद्दल बोलताना तो म्हणाला, की एका दिवसात २४ तास असतात. ते कसे खर्च करायचे हा ज्याचा त्याचा निर्णय असतो.

मी जर सोशल मीडियावर असतो तर माझा बराच वेळ तिथे गेला असता. मला माझ्या मुला-बाळांसोबत वेळ घालवायचा असतो. पुस्तके वाचायची असतात. आणखी इतर कामांना सुद्धा वेळ द्यायचा असतो. सोशल मीडियावर कधीच येणार नाही असा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही. मात्र  सोशल मीडियावरील एवढ्या अनोळखी लोकांजवळ माझे मत व्यक्त करणे आणि त्यातील काहींना वाईट वाटल्यावर ज्‍या कमेंट्‌स येतील त्यापासून दूर राहिलेले कधीही चांगले. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी मी सोशल मीडियापासून दूर राहतो, असे सैफ म्हणाला.