राजकुमार राव अन् पत्रलेखाचा हनीमून रद्द
लग्नाच्या घाईगडबडीत अनेक कामे पेंडिंग असल्यामुळे अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनी यांनी हनीमूनला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे लग्न १५ नोव्हेंबरला धूमधडाक्यात झाले. गेली अनेक वर्षे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. प्रेमाचे रूपांतर त्यांनी लग्नात केले आहे. लग्नानंतर प्रत्येक जोडप्याचं हनीमूनला कुठे जायचं याचं प्लॅनिंग सुरू होतं, मात्र हे दाम्पत्य त्याला अपवाद ठरले आहे, असेच म्हणावे लागेल. अर्थात ते हनीमूनला जाणारच नाहीत असं नाही. ते जाणार आहेत, पण खोळंबलेली कामे पूर्ण करून.
राजकुमारकडे सध्या भीड चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हांनी त्याला आधीच काही तारखा दिल्या आहेत. चालू महिना आणि पुढच्या डिसेंबर महिन्यात त्याला हे शूटिंग पूर्ण करायचं आहे. पत्रलेखाकडेही काही कामे असून, ते तिला पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर दोघे निवांत हनीमूनला जातील. दोघांचे प्रेम कसे झाले, याची उत्सुकता अनेक चाहत्यांना असते. लव्ह सेक्स और धोका या चित्रपटात सर्वप्रथम पत्रलेखाने राजकुमारला पाहिले. या चित्रपटात जशी भूमिका त्याच्या वाट्याला आली तसाच तो प्रत्यक्षही आयुष्यातही असेल, असे एकवेळ पत्रलेखाला वाटले होते. पण जेव्हा ती त्याला भेटली, बोलली आणि त्याच्यासोबत काही वेळ घालवला तेव्हा ती त्याच्या प्रेमातच पडली.
एका जाहिरातीमध्ये पत्रलेखाला राजकुमारने पहिल्यांदा पाहिलं होतं. २०१० मध्ये दोघे एकत्र आले होते. २०१४ मध्ये सिटी लाइट नावाच्या चित्रपटात त्यांनी एकत्र कामही केलं. त्यांची लव्हस्टोरी इतकी वाढली की, लग्नाच्या नात्यात कधी रूपांतरीत होते, याची उत्सुकता चाहत्यांनाही लागली होती. दोघे प्रेम करणाऱ्यांसाठी आयडॉल मानले जातात. कारण आजच्या जगात आज प्रेम केलं, काही काळ सोबत राहिलं की एकमेकांना सोडून देणारी जोडपी दिसून येतात. तिथे राजकुमार आणि पत्रलेखाचे प्रेम इतकी वर्षे टिकले, वाढले, भांडण झाले तरी तुटले नाही, ही कौतुकाचीच बाब म्हणावी. प्रेम असावं तर असं आणि इतकं, असं म्हणता येईल.