लग्नघटिका समीप येता.. कॅटरिना-विकीच्या लग्नाचा Live Report!

कशी झाली तयारी, कसे लागणार लग्न, कोण कोण येणार जाणून घेऊया...
 
 
बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आल्याने घाई सुरू आहे. राजस्‍थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस राजमहालात आयोजित हा शाहीविवाह सोहळा ७, ८ आणि ९ डिसेंबर असे तीन दिवस चालणार आहे. लग्नाला निवडक व्यक्‍ती, मित्र-मैत्रिणी उपस्‍थित राहणार आहेत. शाही विवाह सोहळ्यापूर्वी दोघे कोर्ट मॅरेज करणार आहेत. त्‍यानंतर दोघे लग्नासाठी राजस्‍थानला रवाना होतील, असे सूत्रांनी सांगितले. बघूया कशी आहे लग्नाची तयारी अन्‌ कोण कोण येणार...

लग्नात १०० बाउन्सर सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत. हॉटेल सिक्स सेन्समध्ये काही बांधकाम सुरू होते. लग्नामुळे ४ डिसेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत ते थांबविण्यात आले असून, या बांधकाम कामगारांना सुटी देण्यात आली आहे. लग्नात कोणतेही विघ्न नको यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. कॅटरिनाने लग्नासाठी या राजमहालाची बुकिंग ४ ते ११ डिसेंबरपर्यंत केलेली आहे. लग्नाची तयारी सहा वेगवेगळ्या कंपन्यांकडे सोपवलेली आहे. पाहुण्यांना थांबण्यासाठी आजूबाजूचे हॉटेल्स, धर्मशाळाही बुक करण्यात आल्या आहेत. विशेष पाहुण्यांसाठी टायगर सफारी करवली जाणार असून, यासाठी वनविभागाच्या गाड्याही तयार असतील.

लग्नाच्या मेहंदीला कॅटरिना अबू जानीने डिझाईन केलेला ड्रेस परिधान करणार असून, संगीत सोहळ्यासाठी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेस घालणार आहे. प्रत्‍यक्षात लग्नाला गुच्ची या ब्रँडने डिझाईन केलेला पोशाख तिने परिधान केलेला असेल. ज्‍या राजमहालात कॅटरिनाचे लग्न होत आहे, त्‍याच्या एका रात्रीच्या मुक्कामासाठी राहण्याचा खर्च जवळपास ७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कौतुकाची बाब म्‍हणजे लग्न लावायला खास महाराष्ट्रातील प्रतिष्ठित पंडित बोलाविण्यात आले आहेत. लग्नाचे संपूर्ण विधी हे पंडित पूर्ण करणार आहेत. दोघांचा विवाह हिंदू प्रथेनुसार होणार आहे. लग्नाला पंतप्रधानांच्या कार्यालयातील पाच बडे अधिकारी हजेरी लावणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयारी सुरू झाली आहे. 

लग्नाला येणारे सेलिब्रिटी...
चित्रपट दिग्ददर्शक शशांक खेतान, करण जोहर, फराह खान, जोया अख्तर, अर्पिता शर्मा, अल्वीरा अग्निहोत्री, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, कबीर खान, मिनी माथूर, रोहित शेट्टी, वरुण धवण, नताशा दलाल, अली अब्बास आदी सेलिब्रिटी लग्नाला येणार आहेत.

एक्‍सवर फुल्ली
पाहुणे मंडळींचीही लगीनघाई वाढली आहे. या लग्नाला कोण येणार याची जितकी चर्चा होतेय, तितकीच कोण येणार नाही म्‍हणजे कुणाला बोलावलेले नाही, याचीही चर्चा होत आहे. कॅटरिनाने तिचा जवळचा मित्र सलमान खानला लग्नाला बोलावले नसल्याची चर्चा होत असतानाच तिने रणबीर कपूर आणि त्‍याची गर्लफ्रेंड आलिया भट्ट यांनाही निमंत्रण दिले नसल्याची माहिती आहे. थोडक्‍यात एक्‍सवर फुल्ली असाच प्रकार कॅटरिनाने केला आहे. सलमान खानसोबत कॅटरिनाचे अफेअर दीर्घकाळ चालले होते. त्‍यानंतर वेगळे होऊन दोघांनी मैत्री कायम ठेवली होती. त्‍यानंतर कॅटरिना रणबीर कपूरच्या प्रेमात पडली होती. दोघांचेही नाते दीर्घकाळ चालले. मात्र अचानक त्‍यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कॅटरिनाने निमंत्रण न दिल्याने खान कुटुंबियांपाठोपाठ कपूर कुटुंबिय सुद्धा लग्नाला जाणार नाहीत, हे स्‍पष्ट झाले आहे.

विकी कौशलबद्दल...
विकीचा जन्म १६ मे १९८८ रोजी श्याम आणि वीणा कौशल यांच्या घरी झाला. श्याम बॉलीवूडमध्ये स्टंटमॅन म्‍हणून काम करत. हे मूळचे पंजाबी कुटुंब असून, मुंबईतील चाळीत रहायचे. शालेय शिक्षण झाल्यावर विकीने राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि एका आयटी कंपनीत नोकरीला लागला. याचदरम्‍यान तो वडिलांसोबत सिनेमाच्या सेटवरही जात होता. अभिनय क्षेत्र त्‍याला यामुळेच खुणावू लागले. किशोर नमीत कपूर यांच्या ॲक्‍टिंग स्‍कूलमध्ये त्‍याने मग प्रवेश घेतला. अनुराग कश्यप यांच्या गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटासाठी त्‍याने असिस्टंट डायरेक्टर म्‍हणून काम केले. नीरज घयवानसुद्धा त्यावेळी कश्यपचे असिस्टंट डायरेक्‍टर होते. घयवान यांनी विकीतील टॅलेंट ओळखून ‘मसान’मध्ये नायक म्हणून सर्वप्रथम संधी दिली. २०१८ मध्ये राझी चित्रपटात पाकिस्तानी आर्मी ऑफिसरची त्‍याने निभावलेल्या भूमिका विशेष चर्चेत राहिली. त्‍यानंतर संजू चित्रपटात संजय दत्तचा मित्र कमलीही त्‍याने बेहतरीन साकारला. २०१९ मध्ये तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. उरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटाने त्‍याला मोठे यश मिळवून दिले आणि नायक म्‍हणून तो प्रथमच चर्चेत आला. त्‍याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले. २०२० मध्ये विकीला करण जोहरने आपल्या भूत - पार्ट वन : द हाँटेड शिपमध्ये संधी दिली. या सिनेमाची शूटिंग सुरू असताना विकीचा अपघात झाला होता. १६ ऑक्टोबर २०२१ ला विकीचा उधम सिंग सिनेमा अमेझॉन प्राईमवर रिलीज झाला असून, त्‍यातील विकीच्या अभिनयाचीही विशेष चर्चा होत अाहे. विकीचे पाय कायम जमिनीवर असतात. दहा बाय दहाच्या खोलीत गेलेले बालपण तो अद्याप विसरलेला नाही.

कॅटरिना कैफबद्दल...
कॅटरिनाचा जन्म १६ जुलै १९८३ रोजी हाँगकाँगमध्ये झाला. तिचे वडील मोहम्मद कैफ ब्रिटनमधील व्यावसायिक असून, आई कश्मिरी आहे. ही सात भावंडं आहेत. तिला तीन मोठ्या बहिणी असून, स्‍टेफनी, क्रिस्‍टिन आणि नताशा अशी त्‍यांची नावे आहेत. तीन लहान बहिणी असून, मेलिस्सा, सोनिया आणि इसाबेल अशी त्‍यांची नावे आहेत. मोठ्या भावाचे नाव माइकल आहे. कॅटरिना लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्‍फोट झाला होता. आईनेच तिचा आणि तिच्या भावंडांचा सांभाळ केला आहे. ती ब्रिटनची नागरिक असून, भारतात रोजगार व्हिसा घेऊन ती काम करते. सुरुवातीला तिने मॉडेलिंग केली. नंतर बॉलीवूडकडे मोर्चा वळवला. वयाच्या १४ व्या वर्षी तिने एक सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. तेव्हापासून ती मॉडेलिंग करू लागली. भारतात शूटिंगदरम्‍यान तिला जाहिराती आणि चित्रपटांचे प्रस्ताव मिळू लागल्याने तिने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिला हिंदी बोलता येत नव्हती. पण आता ती चांगल्या प्रकार हिंदी बोलते. सलमान खानसोबत तिचे अफेअर सुरू असल्याची चर्चा २००४ मध्ये सुरू झाली होती. २०१० मध्ये त्‍याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अजब प्रेम की गजब कहानीच्या सेटवर ती रणबीर कपूरच्या प्रेमात पडली. २०१३ मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला. जगातील सर्वांत सेक्सी महिला म्‍हणून तिला गौरविण्यात आले आहे.