गंगूबाईची ऑफर मिळाल्यावर म्‍हणून घाबरली होती आलिया... तिला वाटलं, मी तर छोटी अन् भूमिका मोठी!

 
आलिया भट्ट तिच्या पिढीची प्रतिभावान कलाकार आहे, याबद्दल कुणाचेही दुमत नाही. निरागस आणि नाजूक मुलगी म्हणून तिला चाहत्यांनी आतापर्यंत पडद्यावर बघितले आहे. मात्र आता वेगळ्याच धाटणीच्या माफिया क्विन गंगूबाई काठीयावाडीच्या रुपात दर्शकांसमोर समोर येणार आहे. संजय लीला भन्सालीचा गंगूबाई काठीयावाडी हा चित्रपट २५ फेब्रुवारी २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली की, जेव्हा गंगूबाई या पात्रासाठी मला विचारले गेले, तेव्हा मी घाबरले होते. संजय लीला भन्सालींना अपेक्षित असलेली गंगूबाई साकारता येईल की नाही याबाबत मी संभ्रमात होते. गंगूबाईसाठी आवश्यक असलेला रोखठोकपणा मी निभावू शकेल की नाही असे मला वाटत होते, असे ती म्हणाली. यावेळी आलियाने वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.

संजय लीला भन्सालींसोबत आलिया आधी इंशाअल्लाह चित्रपटात काम करणार होती. मात्र काही कारणास्तव तो चित्रपट बनू न शकल्याने मला खूप वाईट वाटले होते. एवढी चांगली संधी माझ्यापासून दूर जात असल्याने मी दुःखी होती, असे आलिया म्हणाली. मात्र संजय सर शब्दाला पक्के आहेत यावर माझा विश्वास होता. हा चित्रपट नाही झाला तरी कधीतरी दुसरा एखादा चित्रपट येईलच. त्यानंतर त्यांनी मला गंगूबाईची स्क्रिप्ट दाखवली. मी तर दिसायला लहान. त्यामुळे गंगूबाईसाठी आवश्यक असलेली ताकद, रोखठोकपणा मी आणू तरी कसा, असे मला वाटत होते.

ॲक्शन चित्रपटात मी कशी दिसेल? मला खरंच जमेल का, याबद्दल स्वतःवर विश्वास नव्हता, असे ती म्हणाली. मात्र संजय सरांनी मला विचार करायला वेळ दिला. मी घरी गेल्यानंतर विचार केला की, मी हे काय करत आहे? ९ वर्षांची असताना मला संजय लीला भन्सालींसोबत काम करायचे स्वप्न होते. आता तर प्रत्यक्षात संधी मिळाली आहे आणि त्यातही असा चित्रपट की ज्याची मुख्य भूमिकाच माझी आहे. मी लगेच संजय सरांना मेसेज करून काम करण्याची तयारी दर्शविली.

जर तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे तर मी गंगूबाई साकारेल, असे मी संजय सरांना म्हटले आणि चित्रपटाची योजना सुरू झाली, असे ती म्हणाली. या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाबद्दल सुद्धा भाष्य केले. रणबीरकपूर सोबत तिचे अफेअर आहे. कोविड नसता तर आधीच आमचे लग्न झाले असते, असे विधान रणबीर कपूरने मागील वर्षी केले होते. यावर ती म्हणाली, की मला स्वप्नातला राजकुमार मिळाला आहे. लग्न योग्य वेळ आल्यावर होईल. मात्र इतर कुणीच आमच्या लग्नाच्या खोट्या पत्रिका छापू नका, असे ती हसत हसत म्हणाली. चांगल्या गोष्टींसाठी थोडा वेळ लागतो. लग्नही योग्य आणि चांगल्या वेळेतच होईल, असेही ती म्हणाली.