सत्तेत असून फायदा काय भो आपला? शिवसेनेचे तालुकाप्रमुख १० दिवसांपासून खडकपूर्णा धरणात उपोषणला बसलेत,पण सरकार दखल घ्यायला तयार नाही...
Oct 11, 2023, 08:07 IST
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेनेचे देऊळगावराजा तालुका प्रमुख अनिल चित्ते, तालुका प्रवक्ते विकास गवई १० दिवसांपासून खडकपूर्णा धरणातील मेव्हणा राजा शिवारातील एका बेटावर आमरण उपोषणाला बसले आहेत. अवैध रेती उत्खनन, लिलाव झालेल्या घाटातून तसेच अवैध वाळू साठ्याच्या लिलावात भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे चौकशी समितीकडून सादर झालेल्या अहवालनुसार संबधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत. विशेष म्हणजे उपोषणाला १० दिवस होत असताना वरिष्ठ पातळीवरून या आंदोलनाची पाहिजे तशी दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे राज्यात सत्तेत असून आपला फायदा काय भो? असा सवालच आता विचारला जात आहे.
जिल्ह्यात सत्ताधारी शिवसेनेचे खासदार, २ आमदार, माजी आमदार आहेत. मात्र असे असताना आंदोलनाची वेळ का यावी? उपोषणकर्त्यांच्या मागण्याच योग्य नाहीत असे सरकारला म्हणायचे आहे का? योग्य असतील तर मग १० दिवसांपासून उपोषण सुरू असताना आतापर्यंत त्यावर का यथोचित कारवाई झाली नाही असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. शिवसेना तालुका प्रमुखांच्या या उपोषणाच्या समर्थनार्थ देऊळगावराजात शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलनही करण्यात आले, मात्र अद्यापही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही.