कृषीपंप, ग्राहकांची वीज कापू नका : उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, 2 मार्चला विधानसभेत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळातील निर्देशानंतर संबंधित यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यात हा प्रश्न ऐरणीवर आला होता. शेगाव तालुक्यातील लासुरा गावात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या आडमुठेपणामुळे एकूणच रोष व्यक्त होत होता. या प्रश्नी भाजपचे तालुकाध्यक्ष विजय भालतडक यांनी महावितरणच्या अभियंत्याला जाब विचारून वीज कापण्याऐवजी त्यांना सवलत द्या, अशी मागणी केली होती.
आज विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत वीज बिल थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा होऊन दोन्ही बाजूंच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही. राज्यातील वीज थकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करून चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.