Buldana Live कार्यालयात जेव्हा “कोब्रा’ अवतरतो..!; नागपंचमीनिमित्त दिली सरप्राईज भेट

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तारीख १३ ऑगस्ट… वेळ दुपारी अडीचची… दिवसही निवडला तो नागपंचमीचा… तो थेट बुलडाणा लाइव्ह कार्यालयात आला. त्याच्या फुत्कारामुळे काही काळ बुलडाणा लाइव्हची टीमही घाबरली… मात्र त्यानंतर सर्पमित्र इलियास खान पठाण यांनी तो तुमचा-आमचा किंवा कुणाचाही शत्रू नाही तर मित्र आहे… त्याला घाबरू नका असे सांगितले अन् बुलडाणा लाइव्हच्या वाचकांशी ऑनलाइन …
 
Buldana Live कार्यालयात जेव्हा “कोब्रा’ अवतरतो..!; नागपंचमीनिमित्त दिली सरप्राईज भेट

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तारीख १३ ऑगस्ट… वेळ दुपारी अडीचची… दिवसही निवडला तो नागपंचमीचा… तो थेट बुलडाणा लाइव्ह कार्यालयात आला. त्याच्या फुत्कारामुळे काही काळ बुलडाणा लाइव्हची टीमही घाबरली… मात्र त्यानंतर सर्पमित्र इलियास खान पठाण यांनी तो तुमचा-आमचा किंवा कुणाचाही शत्रू नाही तर मित्र आहे… त्याला घाबरू नका असे सांगितले अन्‌ बुलडाणा लाइव्हच्‍या वाचकांशी ऑनलाइन संवाद साधत शंकानिरसन केले. सापांबद्दलची माहिती देताना असलेले गैरसमजही दूर केले. बुलडाणा लाइव्हने खास आजच्‍या दिवसानिमित्त या कार्यक्रमाचे थेट ऑनलाइन प्रक्षेपण केले.

जिल्ह्यात सध्या सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून नागपंचमीनिमित्त सर्पमित्र इलियास कौसेन पठाण यांना यांचा जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. काल-परवा शहरातील परिसरात पकडलेल्या कोब्रासह काही सापही त्‍यांनी सोबत आणले होते. यावेळी लाइव्ह ग्रुपचे समूह सल्लागार मनोज सांगळे यांनी सर्पमित्र श्री. पठाण व नीलेश जाधव यांचे स्वागत केले. प्रास्‍ताविकात जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांनी सर्पमित्रांचा परिचय करून दिला.

बुलडाणा जिल्ह्यात सापांच्‍या २९ जाती
जगभरात सापांच्‍या ३ हजार प्रजाती आढळतात. भारतात आढळणाऱ्या २८२ प्रजातींपैकी ६९ साप विषारी, महाराष्ट्रात आढळणाऱ्या ५२ प्रजातींपैकी १२ विषारी तर बुलडाणा जिल्ह्यात आढळणाऱ्या २९ प्रजातीपैकी ४ साप हे विषारी असल्याचे श्री. पठाण यांनी सांगितले. विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने लोक सर्वच सापांना घाबरतात आणि भीतीने मारून टाकतात. त्यामुळे जैविक साखळीचे मोठे नुकसान होते, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात कोब्रा म्हणजेच नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे असे चार विषारी साप आढळतात. नाग आणि मण्यारची मादी अंडी घालून पिल्लांना जन्म देते तर घोणस आणि फुरसेची मादी थेट पिलांना जन्म देते.

१० कोटी वर्षांपूर्वी सापाचे अस्तित्व
सापांची प्रजाती माणसाच्या आधीची आहे. १० कोटी वर्षांपासून सरपटणाऱ्या साप या प्राण्यांचे अस्तित्व होते. उबदार हवामानात साप आढळतात. साप हा थंड रक्ताचा प्राणी असून, न्यूझीलंड, आयर्लंड आणि बर्म्युडा या देशांमध्ये साप आढळत नाहीत. प्रजनन वेळी साप ४ ते १०० पर्यंत अंडी देऊ शकतो तर थेट पिलांना जन्म देणाऱ्या जाती ५ ते ५० पिलांना जन्माला घालतात.

सापाबद्दलचे गैरसमज, अंधश्रद्धा
साप बदला घेतो हा गैरसमज समाजात प्रचलित आहे. जोडीरादाच्या मृत्यूचा बदला घेतल्याचे चित्रपटात दाखवतात. वास्तवात सापाला नाती कळत नाहीत. नर आणि मादी केवळ मिलनाच्या वेळी एकत्र येतात. सापाच्या बुद्धीचा विकास झालेला नसतो. त्याला माणसाइतके स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे साप बदला घेतो या गोष्टीला कोणताही आधार नाही. साप पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. उंदीर, किडे, पक्षी, छोटे साप, अंडी, बेडूक हेच त्याचे खाद्य आहे. त्यामुळे साप दूध पितो या कोणताही आधार नाही. नाग हा हलणाऱ्या वस्तूवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे तो डोलतो असा भास होतो. वास्तवात सापाला कान नसतात. त्यामुळे त्याला ऐकू येत नाही म्हणून संगितावर डोलतो ही अंधश्रद्धा आहे. नागमणी, सापाच्या अंगावर केस, साप गुप्तधनाची रक्षा करतो. इच्छाधारी रूप धारण करतो या सर्व भाकड कथा आहेत. सापाचे जेमतेम आयुष्य नाग मण्यार यांचे ५ ते १४ वर्षे तर अजगारांच्या प्रजातींचे ४० वर्षांपर्यंत असते. साप गायी-म्हशींचे पाय बांधत नाही. चावल्यानंतर मंत्राने उतरत नाही. सापाला दोन तोंड नाहीत, असेही श्री. पठाण यांनी स्पष्ट केले.

तसे असते तर अत्तराच्या दुकानात शेकडो साप निघाले असते…
सापाला सुगंधी फुले आवडतात म्हणून तो फुलांच्या झाडावर असतो. फुलांची झाडे घराशेजारी लावू नये असा गैरसमज आहे. फुलांच्या झाडावर किडे, पाली व छोटे किडे असतात. साप त्या भक्ष्याच्या शोधात तिथे येतो. सापाला जर सुगंध आवडत असता तर अत्तराच्या दुकानात तर शेकडोने साप निघाले असते, असे श्री. पठाण विनोदाने म्हणाले.

…म्हणून साप शेतकऱ्यांचा मित्र
सापाचे मुख्य भक्ष उंदीर आहे. देशभरात माणसांच्या संख्येपेक्षा उंदरांची संख्या आठपट अधिक आहे. २७ टक्के धान्य उंदीर नष्ट करतात. एकटा धामण जातीचा साप वर्षभरात २५० उंदरांना खाऊन टाकतो. यासोबतच साप जैवसाखळीचा महत्वाचा घटक आहे. आक्रमकता हा सापाचा स्वभाव नसून, तो गरीब प्राणी आहे. मात्र त्याला असुरक्षित वाटले तेव्हाच तो दंश करतो. ६५ टक्के सर्पदंश हे रात्री होतात.

सर्पदंश होऊ नये म्हणून
सापाचे मुख्य भक्ष्य हे उंदीर असते. उंदीर घरात राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. उंदरांनी घरात येण्यासाठी तयार केलेले बिळे बुजवून टाकावीत. घराशेजारी किंवा घरात अडगळ ठेवू नये. अडगळीच्या ठिकाणी काम करताना काळजी घ्यावी. शेतात काम करत असताना पायात बूट व हातात हातमौजे घालावीत. घर,दुकान किंवा ऑफिसमध्ये साप निघाल्यास सर्पमित्रांना कळवावे.

तरीही सर्पदंश झालाच तर…
सर्पदंश झाला तर कोणत्याही धार्मिक ठिकाणी किंवा मंत्रिकाकडे जाऊ नये. सर्पदंश झालेल्या जागेच्या वर आवळपट्टी बांधावी. दंश झालेली झाली हृदयापासून खाली ठेवावी. दंश झालेली जागा जंतूंनाशकाने स्वछ धुवून लगेच हॉस्पिटल गाठावे, असा सल्लाही सर्पमित्र श्री. पठाण यांनी दिला.