बुलडाण्यातील शिकाऊ चालकांना कळलाय अपघातापासून वाचण्याचा कानमंत्र!; जालन्याहून आलेल्या तज्‍ज्ञांचे शिवकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मार्गदर्शन

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी, नियम कसे पाळावेत इथपासून तर संकटात कसे वाचावे इथपर्यंत... इत्‍यंभूत मार्गदर्शन शिकाऊ वाहनचालकांना जालन्यातील प्रसिद्ध भागीरथी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विकास काळे यांनी काल, २७ फेब्रुवारीला केले.

बुलडाणेकरांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या प्रसिद्ध शिवकृपा मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. हॉर्न कधी वाजवावा, रस्त्यावरील सिग्नलची साईन बोर्डची परिभाषा याबद्दल सांगत श्री. काळे यांनी पांढऱ्या रेषांचे महत्त्व पटवून दिले. रस्त्यावर ऐंशीच्या आत गाडीचा स्पीड हवा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. रस्त्याने चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. फक्त फुटपाथ जिथे आहे तेथे डाव्या बाजूने चालावे, असे त्यांनी सांगितले. चालकाचे कर्तव्यसुद्धा त्यांनी उलगडले.

गाडी चालू करण्यापूर्वी सेट ॲडजस्टमेंट करणे, नंतर गाडीचे दरवाजे पूर्ण बंद आहे की नाही याची खात्री करूनच गाडी चालू करावी, असे त्यांनी सांगितले. गाडीची देखभाल कशी घ्यावी, सकाळी पेट्रोल भरावे. जेणेकरून आपणास पेट्रोल पूर्ण मिळेल. दुपारी उन्हात पेट्रोल भरले तर पेट्रोलचे बऱ्याच प्रमाणात बाष्पीभवन होते, असेही ते म्‍हणाले. टायरमध्ये नायट्रोजन हवेचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले.

जेणेकरून टायर थंड राहतील आणि अपघातांचे प्रमाण कमी राहील. गाडी पार्किंगला सोडून जाताना पार्किंग ब्रेक म्हणजेच हँड ब्रेक टाकावा. प्रत्येक वाहन चालकाने गाडी चालवताना त्याच्याजवळ लायसन्स, इन्शुरन्स तसेच पीयूसी ही कागदपत्रे सोबत ठेवावी. गाडी चालवताना अतिवेगाने वाहन चालू नये. तसेच डेरिंग करू नये, असे श्री. काळे म्हणाले. शिवकृपाचे संचालक सचिन सोनटक्के, नितीन सोनटक्के, चंद्रकांत सोनटक्के, ऋषिकेश वायकोस तसेच जिल्हा परिषद परिषद अध्यक्षा सौ. मनिषा पवार तसेच शिकाऊ चालक यावेळी मोठ्या संख्येने हजर होते.