२५ लाखांच्या कर्जाचे आमिष दाखवून तरुणाला २ लाखांना गंडवले!; शेगाव तालुक्यातील घटना
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २५ लाखांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची १ लाख ९९ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. तरुणाने शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात काल, १९ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सचिन मुकुटराव निळे (२५, रा. कनारखेड, ता. शेगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. सचिनच्या फोनवर ९७१८९७२८६९ व ७८३५९३३०९७ या दोन क्रमांकावरून फोन आले. तुला २५ लाख रुपयांचे कर्ज प्रधानमंत्री कर्ज योजनेद्वारे मंजूर करून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी आयसीआयसीआय बँकेत खाते उघडून त्यात अडीच लाख रुपये टाकायला सांगितले. त्याप्रमाणे सचिनने बँकेत खाते उघडून त्यात अडीच लाख रुपये टाकले.
२४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या काळात एटीएम कार्डच्या मागील नंबर व ओटीपी विचारला. नंतर सचिन यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून १ लाख ९९ हजार रुपये गायब झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेगाव ग्रामीण पोलिसांत प्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीवरून ९७१८९७२८६९ व ७८३५९३३०९७ या मोबाइल क्रमांक धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.