हवेत गोळीबार करून हल्लेखोर मेंढपाळांना पिटाळले! ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ४० ते ५० मेंढपाळांच्या गटाने गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्या. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. यावेळी झालेल्या झटापटीत दोन कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे. ही घटना खामगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव नाथ भागात काल, १० ऑगस्टच्या सायंकाळी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला असून, बोराखेडी पोलीस ठाण्यात आज, ११ ऑगस्ट रोजी तक्रार देण्यात येणार आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यात अवैध मेंढ्या चराईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनकर्मचारी गस्तीवर गेले होते. पिंपळगाव नाथ भागात मेंढपाळ अवैधरित्या मेंढ्या चारत असल्याचे निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांनी त्यांनी हटकले. त्यांनी लाठ्याकाठ्यांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. दोन कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू केल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी हवेत एक गोळी झाडली. त्यामुळे तेथील १० ते १२ मेंढपाळ पळून गेले. मेंढपाळांनी ही माहिती त्यांच्या साथीदारांना दिली. त्यामुळे थोड्याच वेळात तिथे आणखी ४० ते ४५ जणांचा जमाव जमला. जमावाजळ लाठ्या काठ्या आणि शस्त्रे असल्याने वनकर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा लोखडे यांनी हवेत गोळीबार करत दोन फैरी झाडल्या. त्यामुळे हल्ला करणारा जमाव घटनास्थळावरून पसार झाला.