चिखलीचा कुख्यात गुंड सय्यद जमीर वर्षभरासाठी स्थानबद्ध!; …२२५ गुन्हेगार, १७ टोळ्या जिल्ह्यातून लवकरच तडीपार!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सण, उत्सवात कोणते विघ्न येऊ नये म्हणून बुलडाणा पोलिसांनी गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. २२५ विघ्नसंतोषी गुन्हेगार आणि १७ टोळ्या जिल्ह्यातून लवकरच तडीपार होऊ शकतात. त्यांच्याविरुद्ध तशी कारवाई जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे पोलीस विभागाने प्रस्तावित केली आहे. ९ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले जाण्याची शक्यता आहे. आजवर ११ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. चिखली शहरातील गोरक्षणवाडीतील रहिवासी सय्यद जमीर सय्यद जहीर (२२) याला एमपीडीए कायद्याअंतर्गत वर्षभरासाठी स्थानबद्ध केले असून, बुलडाण्यातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी बुलडाणा लाइव्हला दिली.
सय्यद जमीर याच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाची दखल घेऊन तसे आदेश पारित केले. त्यामुळे ९ सप्टेंबपासून त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०१३ नंतर पहिल्यांदाच अशी कारवाई झाली आहे. यामुळे गुन्हेगारांत वचक निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक (बुलडाणा) बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते, चिखलीचे पोलीस निरिक्षक अशोक लांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक मनिष गावंडे, पोलीस अंमलदार शरद गिरी, संजय भुजबळ यांनी पार पाडली.