गावालगतच्या विहिरीत उडी घेऊन १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; देऊळगाव घुबे येथील घटना
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावालगतच्या विहिरीत उडी घेऊन १५ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना देऊळगाव घुबे (ता. चिखली) येथे ४ सप्टेंबरला दुपारी समोर आली.
मयुरी प्रभाकर घुबे (रा. देऊळगाव घुबे) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिच्या आईचा दुसरा विवाह गावातीलच प्रभाकर घुबे यांच्यासोबत झाला होता. तिच्या वडिलांनीसुद्धा दुसरे लग्न केलेले आहे. मयुरी आई-वडिलांकडे न राहता गावातीलच मामांकडे राहायची. ४ सप्टेंबरला मामा व घरातील सर्व जण शेतात कामाला गेले होते.
मयुरी एकटीच घरी होती. दुपारी तिने गावालगतच्या विहिरीवर जाऊन उडी घेतली. बुडून तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती तिच्या मामाने अंढेरा पोलिसांना दिली. ठाणेदार गणेश हिवरकर यांनी सहकारी पोहेकाँ पंजाबराव साखरे, श्री. उगले यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास सुरू आहे. आत्महत्येचे कारण बातमी लिहीपर्यंत कळू शकले नाही.