खासदार सुप्रिया सुळे सिंदखेड राजात… “सिंदखेड राजा, लोणार व शेगाव शहरांना जोडण्याची योजना हाती घेणार; मुख्यमंत्र्यांना भेटणार!’
बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पर्यटन वाढीसाठी ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धन झाले पाहिजे. यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे. सिंदखेड राजा, लोणार व शेगाव या तिन्ही महत्त्वपूर्ण शहरांना जोडण्याची योजना आखली जावी. सिंदखेड राजा शहरातील पायाभूत सुविधांवर काम करण्याची आवश्यकता आहे. सिंदखेड राजाच्या पर्यटन आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी आपण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पर्यटन मंत्र्यांची भेट घेणार आहोत. येथील विकास कामासंदर्भात सर्व प्रस्ताव केंद्रीय पुरातत्व विभागाने तत्काळ आपल्याकडे पाठवावे, अशी सूचना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सिंदखेड राजात प्रशासनाला केली.
सिंदखेड राजातील ऐतिहासिक व पुरातन वास्तूंची पाहणी आज, २५ सप्टेंबर रोजी खा. सुळे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे समवेत केली. राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ, मोती तलाव, निळकंठेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, राजे लखुजीराव जाधव यांची समाधी यासह अन्य ऐतिहासिक वास्तू त्यांनी पाहिल्या व माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे, तहसीलदार सुनील सावंत यांच्यासह लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, महसूल विभाग, पोलीस विभाग, पुरातत्त्व विभाग, पर्यटन विभागासह अन्य विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.️ यानंतर सिंदखेड राजा पंचायत समिती सभागृहात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत खा. सुळे यांनी आढावा बैठक घेतली.
बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, वंशज शिवाजी जाधव, नगराध्यक्ष सतिश तायडे, राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकारी जया वाहणे, केंद्रीय पुरातत्व विभागाचे संवर्धक मिलींद अंगाईतकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळवाघे, विद्युत मंडळाचे अभियंता आदी उपस्थित होते. लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी आपण संसदेत हा विषय मांडणार आहे, असेही खा. सुळे म्हणाल्या. वन विभागातील इको टुरीझम प्रकल्प, जालना- खामगाव- शेगाव रेलवेमार्ग हे विषय त्यांनी समजुन घेतले. सावित्री- जिजाऊ दशरात्रोत्सव महोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी या दरम्यान शहरात साजरा केला जातो. हा महोत्सव वेरुळ महोत्सवाच्या धर्तीवर साजरा व्हावा, या मागणीला त्यांनी दुजोरा दिला. हा कार्यक्रम महीला सक्षमीकरणासाठी संदेश देणारा ठरावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. शिंगणे म्हणाले, की शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. तसे प्रयत्न सुरूदेखील आहे. परंतु कोविडमुळे या विकास कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. आता कोविड असला तरी निर्बंध शिथील झाले आहे. त्यामुळे शहराच्या विकासाची कामे सुरू करण्यात येत आहे. ही विकास कामे गतीने पूर्ण करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. ग्रामदैवत रामेश्वर मंदिरात खा. सुळे यांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.