प्राध्यापकाची हर्रासमेंट! फेक अकाऊंट उघडून टाकले महिलांचे अश्लील फोटो!; बुलडाण्याच्या पोलिसांनी औरंगाबादेतून विकृताला उचलले!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्राध्यापकाचे इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून त्यावर अश्लील फोटो अपलोड करून त्यांची बदनामी करणाऱ्या विकृताला बुलडाणा सायबर पोलिसांनी औरंगाबाद येथील उस्मानपुरा येथून काल, १९ सप्टेंबर रोजी अटक केली. वैभव बाळासाहेब लोठे (२०, रा. शेवगल, ता. घनसावंगी, जि. जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील वैभव घनश्याम कुटे यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्यात याप्रकरणात तक्रार दिली होती. ते जालन्यातील ओजस कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्राध्यापक आहेत. ते स्वतः सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांच्या नावाचे इन्स्टाग्रामवर खाते उघडून व प्रोफाइलमध्ये त्यांचा फोटो वापरून खात्यावर अश्लील व महिलांचे अर्धनग्न फोटो अपलोड करण्यात आले होते. ही बाब त्यांच्या भावाने वैभव कुटे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने २७ जुलै रोजी पोलिसांत तक्रार देण्यात आली होती.
आपली बदनामी करण्यासाठीच कुणीतरी हा प्रकार केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. तांत्रिक तपास असल्याने हा गुन्हा सायबर क्राईम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. तांत्रिक तपासाअंती हा गुन्हा आरोपी वैभव लोंढे याने केल्याचे पोलीस तपासात समोर आले. सायबर पोलिसांनी त्याला औरंगाबादच्या उस्मानपुरा भागातून अटक केली. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन बुलडाणाचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी, सहायक पोलीस निरिक्षक सुभाष दुधाळ, पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, पवन मखमले, राजू आढवे, कैलास ठोंबरे, योगेश सरोदे, शोएब अहमद यांनी केली.