रेखा जरे हत्याप्रकरणाचा सूत्रधार बाळ बोठे अखेर गजाआड

साडेतीन महिन्यानंतर हैदराबादेत पोलिसांनी आवळल्या मुसक्या नगर : नगरसह पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य फरार आरोपी बाळ ज. बोठे याला पोलिसांनी अखेर साडेतीन महिन्यानंतर हैदराबादेतून अटक केली. त्याच्या अटकेमुळे रेखा जरे यांच्या हत्येचे नेमके कारण समोर येणार असून या प्रकरणाचा घटनाक्रम व इतर तपशीलही समजू शकणार आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या व यशस्वी …
 

साडेतीन महिन्यानंतर हैदराबादेत पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नगर : नगरसह पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य फरार आरोपी बाळ ज. बोठे याला पोलिसांनी अखेर साडेतीन महिन्यानंतर हैदराबादेतून अटक केली. त्याच्या अटकेमुळे रेखा जरे यांच्या हत्येचे नेमके कारण समोर येणार असून या प्रकरणाचा घटनाक्रम व इतर तपशीलही समजू शकणार आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या व यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गेल्यावर्षी ३० नोव्हेंबररोजी पुणे-नगर मार्गावर जातेगाव फाटा भागात गूढ हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मारेकर्‍यासह काही आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली व खुनाचा उलगडा केला. त्यात या हत्याकांडाचा सूत्रधार हा नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व एका राज्यस्तरीय दैनिकाचा माजी संपादक राहिलेला बाळ.ज. बोठे हाच असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून तो फरार होता. त्याने जामिनासाठी विविध न्यायालयांत अर्ज दाखल केले. पण ते फेटाळले गेले. तसेच त्याला फरार घोषित करण्यात आले होते. तसेच ९ एप्रिलपर्यंत शरण न आल्यास त्याच्या मालमत्तेच टाच आणण्याचे आदेश पारनेर न्यायालयाने दिले होते.
बाळ ज. बोठेचा शोध राज्यभर घेतला जात होता.दरम्यान, नगरच्या स्थानिकगुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने हैदराबाद येथून शनिवारी रात्री उशीरा अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे बहुचर्चित रेखा जरे हत्याप्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.