राज्यात फेरबदल… ? मंत्रिमंडळात की पोलिस दलात?
चर्चेला ऊत… शरद पवारांपाठोपाठ विश्वास नांगरे पाटील, मिलिंद भारंबे वर्षावर
मुंबई : राज्यात फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. हे फेरबदल पोलीस दलात होणार की मंत्रिमंडळात? याबाबत जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके सापडल्याचे प्रकरण गुंतागुंतीचे होत चालले असून त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. त्यानंतर त्यांची दहा दिवसांच्या एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली. हे प्रकरण स्थानिक असून त्याबाबत मी काहीच बोलणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद पवार म्हणाले होते. पण त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील,मिलिंद भारंबे हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटीसाठी रवाना झाले. त्यांच्यात दीर्घकाळ बैठक सुरू आहे. त्यामुळे सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस दलात फेरबदलाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळात खातेबदल होणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार निर्णय घेतील व तो लवकरच तुम्हाला कळवला जाईल, असे विधान केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळात खांदेपालट किंवा खातेबदल होणार नाही, त्या अफवा आहेत, असे विधान केले. दोन पक्षांच्या दोन नेत्यांनी परस्परविरोधी वक्तव्ये केल्याने याबाबतचा संभ्रम वाढला आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकांचा जोर वाढल्याने गोंधळाचे वातावरण व चर्चा जोरात आहे. यामुळे मुंबईतील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.