बाप्पा यांनी तर श्रद्धेलाच विकलं… दर्शनासाठी प्रत्येकाकडून घेणार १०० रुपये, नाही तर बाहेरूनच हात जोडा!
नाशिक : नाशिकची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या कालिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांना आता १०० रुपये मोजावे लागणार आहेत. १०० रुपयांचे टोकन नसेल तर दर्शन घेता येणार नाही, असा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे भाविकांत या निर्णयामुळे नाराजी व्यक्त होत असताना मंदिर प्रशासनाने मात्र निर्णयाच्या समर्थनार्थ अजब कारणं दिली आहेत.
कोरोना काळात राज्यातील मंदिर बंद होती. नुकतीच मंदिर उघडण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र नाशिकच्या कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या पैसे घेऊन दर्शन देणे सुरू केल्यामुळे भाविक बुचकळ्यात पडले आहेत. भाविकांना १०० रुपयांचे टोकन ऑनलाइन मिळणार आहे. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव आण्णा पाटील म्हणाले, की नियमांच्या आधीन राहून ही टोकन पद्धत स्वीकारली आहे. सॉफ्टवेअरसाठी, भाविकांच्या सुरक्षेसाठी, साफसफाई करण्यासाठी, फवारणीसाठी खर्च लागतो. या सर्व गोष्टी भाविकांना पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे ते म्हणाले. एका तासात ६० भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येईल. प्रसाद ,फुलं, नारळ देवीला अर्पण करता येणार नाही, असेही मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.