प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईचा गळा चिरला
प्रेमाला विरोध केला म्हणून १५ वर्षीय मुलीचे धक्कादायक कृत्य
कल्याण : आपल्या प्रेमाला आई विनाकारण विरोध करत आहे, असा समज करून घेऊन एका १५ वर्षीय युवतीने प्रियकराच्या मदतीने आईची तीक्ष्ण हत्यारांनी सपासप वार करून तिचा गळा चिरला. यात आईचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, उल्हासनगर येथे कॅम्प नंबर चारमध्ये विद्या तलरेजा ही महिला तिच्या मुलीसह राहत होती. या महिलेच्या मुलीचे कारखान्यात काम करणार्या दिलजीत यादव नावाच्या तरुणासोबत प्रेम जुळले. आईला त्यांच्या या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागली. पण त्यांनी तिला विरोध केला. त्यामुळे भरकटलेल्या मुलीने प्रियकाराला फितवून देत तू माझ्या आईची हत्या कर,असे सांगितले. मी कामाला जाणार आहे. त्यावेळी तू घरात शिरून आईचा काटा काढ, अशी टीप मुलीने दिलजीतला दिली. प्रेयसीने सांगितल्याप्रमाणे दिलजीत घरात घुसून विद्या यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी सपासप वार केले. वार गळ्यावर केले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.पोलीसांनी त्याला त्याच्या घरातून अटक केली. त्यानंतर त्याने धक्कादायक घटनेची कबुली दिली. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला सुधारगृहात पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्ररकणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.