पदभार स्वीकारताच उच्च न्यायालयाच्या निर्णयास राज्य सरकारचे ‘वळसे’
देशमुख चौकशी प्रकरणात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात
मुंबई : राज्याचे गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांचा प्राधान्यक्रम सांगितला. त्यानुसार ही जबाबदार नीट पार पाडण्याचे काम करेन, प्रशासकीय कामात हस्तक्षेप न करणे, पोलीस दलाचे सक्षमीकरण करणे, स्वच्छ प्रशासन, पोलीस भरती गतीमान करणे, बदल्यांमध्ये हस्तक्षेप न करणे,पोलिसांना घरे बांधून देणे तसेच शक्ती कायद्याची अंमलबजावणी याला प्राधान्य देणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. पण यासोबतच महत्वाच्या निर्णयावर भाष्य करताना अनिल देशमुख यांच्यावरील आरोपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने जो सीबीआय चौकशीचा निर्णय दिला त्याविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने जो आदेश दिला आहे त्याला राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करेल, असे सांगण्यासही वळसे पाटील विसरले नाहीत. परंतु सीबीआय चौकशीच्या निर्णयास आव्हान देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.