धक्कादायकच… ई कॉमर्स ॲपवरून थेट महिलांची विक्री!; वकील महिलेने केली राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार
औरंगाबाद : जग हे एक बाजार झाले आहे. बाजारात वस्तूंची विक्री होत असते. आता त्यातही पारंपरिक बाजार मागे पडून लोक ई-काॅमर्सच्या मागे लागले आहेत. ई-काॅमर्सच्या बाजारपेठेने तरुणांना लक्ष्य केले आहे. तरुणांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांच्या सोईने बाजारात कधी, काय आणि किती किंमतीत विकायला आणायचे हे ठरविण्यात कंपन्यांच्या व्यूहनीतीला यश येते. या ई-काॅमर्सच्या बाजारात काहीही मिळायला लागले आहे. सुईपासून मोटारीपर्यंत काहीही उपलब्ध होते; परंतु आता अशाच ई-काॅमर्स ॲपवरून महिलांची विक्री होत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
ई कॉमर्सवरून शस्त्रास्त्रेही मिळतात. तलवारी मिळतात. देशविघातक गोष्टीचा व्यापार सुरू झाला आहे. यात आता नवीन विक्रीजन्य बाबीची भर पडली आहे; परंतु ते कोणतेही उत्पादन नाही, तर मानवी तस्करीशी संबंधित बाब आहे. एका ई कॉमर्स अॅपवरून थेट महिलांची विक्री करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांची छायाचित्रे अपलोड करण्यात आली आहे. ही बाब एका महिला वकिलाच्या निदर्शनास आली. संबंधित अॅपवर बंदी आणण्याची मागणी औरंगाबादेतील अॅड. अस्मा शेख यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. मध्ययुगीन काळात जशी महिलांची विक्री व्हायची, तशी विक्री आताही काही भागात गोपनीय पद्धतीने होत आहे; परंतु महिलांची छायाचित्रे अपलोड करून त्यांची बोली लावण्याचा हा प्रकार गंभीर तितकाच संतापजनक असाच म्हणावा लागेल.