धक्कादायक… सरकारी नोकरीच्या आमिषाने ३० वर्षीय परिचारिकेवर सामूहिक अत्याचार!
पनवेल : सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून ३० वर्षीय परिचारिकेवर दोघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला. ही घटना पनवेलमध्ये समोर आली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला पती व मुलासह पंढरपूरला राहते. लॉकडाऊनमुळे नोकरी गमवावी लागल्याने ती नवीन कामाच्या शोधात होती. गेल्या महिन्यात तिला मोबाइलवर नोकरी संदर्भातील मेसेज आला. तिने मेसेजमधील मोबाइल नंबरवर संपर्क साधला असता पनवेल मधील सरकारी रुग्णालयात साफसफाईचे काम करण्याची नोकरी देतो, असे त्यांनी सांगितले. तिला भेटण्यासाठी पनवेलमधील क्रेझी बॉईज या बारमध्ये बोलावले. महिला १८ सप्टेंबरला तिथे गेली.
बारमधील गुलाम शेख व शेट्टी या दोघांनी तिला बारमध्ये येणाऱ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवल्यास भरपूर पैसे मिळतील, असे सांगितले. तिने नकार दिल्याने तिला गुंगीचे औषध टाकलेले पाणी पाजले. त्यानंतर दोघांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. शुद्धीवर आल्यावर तिने कशीबशी सुटका करून घेत मैत्रिणीला सोबत घेऊन विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुलाम शेख व शेट्टी या दोघांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.