आषाढी वारी पायी होऊ द्यायची की नाही… सरकार-विरोधकांत जुंपली
मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा)ः पंढरपूरच्या आषाढी वारीवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असताना धार्मिक उत्सव व यात्रांवर निर्बंध आहेत. दुसरीकडे भाजपाने आषाढी वारी पायी होऊ देण्याचा आग्रह धरल्याने काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप हा हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुघलांचे सरकार आहे. फक्त मंदिरे बंद ठेवली असून, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. अनलॉकमध्ये मंदिरांचा समावेश करावा. यंदा पायी वारी झालीच पाहिजे, अशी भूमिका भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीने घेऊन नेते तुषार भोसले यांनी आषाढी वारी होऊ द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र एकूण वातावरण बघता वारीमुळे कोरोनाचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे सचिन सावंत यांनी या वादात उडी घेत भाजपाची अध्यात्मिक आघाडी भोंगळवाद स्थापित करत आहे, असा आरोप केला. धर्माच्या राजकारणासाठीचे हे थोतांड बंद करा, असेही त्यांनी म्हटले आहे.