आश्चर्यम्… भूकंपाचा धक्का बसला अन् बोअरमधून येऊ लागले गरम पाणी!; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
यवतमाळ : निसर्गात अनेक चमत्कार होत असतात. हे चमत्कार दैवी नसून त्यांना शास्त्रीय आधार असतो. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी सर्वज्ञात आहे. तिथे गरम पाण्याची कुंडे आहेत. तांदूळ फडक्यात बांधून पाण्यात बुडवून बाहेर काढला, तर भात तयार होतो. असाच प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील अंबोडा येथे समोर आला आहे.
अंबोडा येथे महादेव भोयर राहतात. त्यांच्या अंगणात एक विंधन विहीर (बोअरवेल) आहे. तिच्यातून गरम पाणी यायला लागले आहे. त्यामुळे पंचक्रोशीत आश्चर्य व्यक्त होत आहे. अर्थात सामान्यांना तसे वाटत असले, तरी भूगर्भशास्त्रज्ञांना तसे वाटत नाही. भूगर्भात अनेक हालचाली सुरू असतात. या भागात झिंकसारखा एखादा धातू असेल तर पाणी गरम होऊ शकते. महाराष्ट्रात शहादा-अक्कलकुवा रस्त्यावर एक झरा आहे. त्यातही आंघोळीसाठी जेवढे गरम पाणी आवश्यक असते, तितकेच गरम पाणी त्यातून येते. या पाण्याने आंघोळ केली, तर त्वचारोग बरे होतात. सेवानिवृत्त शिपाई भोयर यांच्या अंगणातील विंधन विहिरीच्या पाण्यात हात घातला तर अक्षरशः चटका बसतो. माजी सरपंच हनवंतराव देशमुख यांनी याबाबत तहसीलदार नामदेव इसाळकर यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. तलाठी अर्चना बोंबले यांनी विंधन विहिरीचे पाणी गरम असल्याची खातरजमा केली. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना दिला. मराठवाड्याला नुकताच भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू महागाव तालुक्यातील साधूनगर येथे होता. अंबोडा हे गाव भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जवळ असल्याने विंधन विहिरीचे पाणी गरम होत असल्याचे सांगितले जाते; परंतु तसे असेल, तर या भागातील सर्वंच विहिरी, कूपनलिका, विंधन विहिरींचे पाणी गरम व्हायला हवे; परंतु तसे झालेले नाही.