वाहऽऽ CP सर..!; दिव्यांग लक्ष्मीसोबत बघा कशी झाली भाऊबिज!
Updated: Nov 7, 2021, 16:12 IST
सोलापूर ः जन्मतःच दोन्ही हातांनी दिव्यांग असलेल्या लक्ष्मी शिंदे हिच्यासोबत भाऊबिज साजरी करून सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी ही दिवाळी अविस्मरणीय केली आहे. पोलीस आयुक्तांनी लक्ष्मीच्या जिद्द आणि चिकाटीचे कौतुकही यावेळी केले.
पूर्व सोलापूरमध्ये लक्ष्मी राहते. लक्ष्मीने सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगले असून, आर्थिक परिस्थिती नसतानाही तिने शिक्षणाची कास सोडलेली नाही. पायाने पेपर सोडवून ती बारावी उत्तीर्ण झाली असून, सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतेय. तिच्या जिद्दीची कहाणी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना कळली. भाऊबीजेचे निमित्त साधून ते लक्ष्मीच्या घरी आले. तिच्याकडून औक्षण करून घेतले. तिने दोन्ही पायांनी बैजल यांचे औक्षण केले.
लक्ष्मीने भावाच्या कपाळी पायाने नामतिलक केला. पायानेच आरती ओवाळली आणि पायानेच पेढा भरवला. भावाबहिणीच्या हा अनोखा सोहळा सोलापूरकरांच्या कायम स्मरणी राहील असा ठरला आहे. यातून स्त्रित्वाचा सन्मान करण्याची भावना वाढीस लागणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आणि पोलीस आयुक्तांचे कौतुकही केले.