'बुलडाणा अर्बन'मध्ये धाडसी चोरी करणारे दोघे जेरबंद!; साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त
जालना- बीड रोडवरील शहागड (जि. जालना) येथील बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या शाखेत २८ ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास तीन दरोडेखोर बंदूक घेऊन घुसले. बंदुकीचा धाक दाखवून बँकेतील नगदी २३ लाख ८७ हजार ९६० रुपये व ३ कोटी ४२ लाख १७ हजार ७११ रुपयांचे कर्जदारांचे तारण ठेवलेले सोने चोरट्यांनी लुटून नेले होते. गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली. घटनास्थळी विशेष पोलीस महानिरिक्षक के . एम . मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दोन दिवस घटनास्थळी भेट देऊन अधिकारी व अंमलदारांना मार्गदर्शन केले. अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखा व गोंदी पोलीस ठाण्याच्या ५ पथके तयार करून चोरट्यांच्या शोधार्थ रवाना केले.
पथकांतील अधिकारी, अंमलदारांनी शहागड व गेवराई परिसर अक्षरशः पिंजून काढला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गेवराई येथील चोरट्यांनी ही चोरी केलेली आहे. माहिती मिळताच गेवराई येथील पोलिसांची मदत घेऊन जालन्याच्या पथकाने मुकीद ऊर्फ मुस्ताफ कासम (रा. गेवराई जि. बीड), संदीप बबन सोळंके (रा. माजलगाव जि. बीड) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यांनी ही चोरी आणखी एका साथीदारासह केल्याची कबुली दिली.
चोरून नेलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडून ८ लाख ५० हजार रुपये नगदी व ३ कोटी ४२ लाख १७ हजार ७११ रुपयांचे कर्जदारांचे बँकेतील सोने असा एकूण ३ कोटी ५१ लाख ६७ हजार ७११ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अधिकारी, अंमलदारांनी पार पाडली. तपास गोंदीचे पोलीस निरिक्षक श्री. बल्लाळ करत आहेत.