आदित्य ठाकरेंना धमकी! आरोपी म्हणतो, मी सुशांतसिंहचा फॅन!!

 
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर सेलने अटक केली आहे. जयसिंग राजपूत (३४) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आदित्य ठाकरे यांना व्हाॅट्स अॅपवर मेसेज करून जयसिंग राजपूतने जीवे मारण्याची धमकी दिली होती. मी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा फॅन असल्याचा दावा आरोपीने केला आहे.
८ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आदित्य ठाकरे यांना जयसिंग राजपूतने व्हाॅट्स अॅपवर मेसेज केला होता. त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या मेसेजमधून जयसिंगने सुशांत सिंह राजपूतच्या  मृत्यूला आदित्य ठाकरे यांना जबाबदार ठरवले होते. त्यानंतर त्याने तिनदा आदित्यना फोन केला. पण आदित्य ठाकरे यांनी फोन उचलला नव्हता. त्यानंतर जयसिंगने ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला होता. ठाकरे यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.