माझाही अनिल देशमुख करण्याचे कारस्‍थान सुरू!

मलिक म्‍हणतात, मी डाव यशस्वी होऊ देणार नाही!!
 
 
मुंबई ः अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाला कामाला लागली असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केला आहे. याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिणार असल्याचेही त्‍यांनी आज, २७ नोव्‍हेंबरला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.
काही लोक माझ्यावर घरावर पाळत ठेवत आहेत. माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करून अडकविण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. काही अधिकारी लोकांना व्हॉट्‌स ॲपद्वारे मसुदा पाठवून त्‍यांच्‍या ई-मेलवरून माझ्याविरुद्ध खोटी तक्रार करायला भाग पाडत आहेत. याचे माझ्याकडे पुरावे आहेत. माझासुद्धा अनिल देशमुख करण्याचा त्‍यांचा डावा मी यशस्वी होऊ देणार नाही. जे माझ्याविरुद्ध षड्‌यंत्र रचत आहेत, त्‍यांच्‍याबद्दल मी पोलिसांत तक्रार करणार आहे, असेही मलिक म्‍हणाले.