साडेतेरा वर्षांची मुलगी आईला म्हणे, राजवर माझे खूप प्रेम... अन् एक दिवस अचानक...
मुंबई : अगदी अल्पवयीन मुलीसुद्धा प्रेमात वेड्या होऊन घर सोडून जात असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील बोरिवली भागात राहणारी साडेतेरा वर्षांची मुलगी मोबाइलवर बोलता बोलता एका मुलाच्या प्रेमात पडली अन् घर सोडून निघून गेली. मुलीच्या आईने याप्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.
अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, काही महिन्यांपूर्वी तिच्या अल्पवयीन मुलीने तिला प्रेमप्रकरणाबद्दल सांगितले होते. माझे राजू नावाच्या एका मुलावर प्रेम आहे. तो सेलू गावचा राहणारा असून औरंगाबाद येथे कामाला आहे. आम्हाला लग्न करायचे आहे, असे तिने तिच्या आईला सांगितले होते. मोबाईल फोनवरून आमची ओळख झाली व फोनवर बोलता बोलता आमच्यात प्रेम झाले, असेही तिने आईला सांगितले होते. त्यावर तू अजून लहान आहेस... तुझे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मी तुझे राजसोबत लग्न लावून देईल, असे तिच्या आईने मुलीला सांगितले होते. मुलीने राजचा मोबाईल नंबरसुद्धा आईला दिला होता. मी १८ वर्षांची झाल्यानंतर राजसोबत लग्न करेल, असेही तिने आईला सांगितले होते.
दरम्यान १६ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता तिची आई घरी आली. त्यावेळेस मुलगी घरी दिसली नाही. तिला फोन करून विचारले असताना मी बाहेर फिरायला आली आहे, असे तिने सांगितले. रात्री ८ वाजता पुन्हा तिने आईला फोन केला व मी राजच्या घरी जात आहे, असे बोलून तिने फोन कट केला. त्यानंतर आईने परत परत फोन करूनही तिने फोन उचलला नाही. त्यानंतर राजला फोन करून बघितला असता राजने सुद्धा फोन उचलला नाही. रात्रभर मुलीची वाट पाहूनही मुलगी घरी न आल्याने राज नावाच्या मुलाने मुलीला फूस लावून पळवून नेले, अशी तक्रार मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिली आहे.