मुलगी विचित्र हेअरस्‍टाइल करून आली, आई रागावली तर...; फोनवर कुणाशी तरी तासन्‌तास बोलायची....

 

भंडारा ः ती अवघ्या १४ वर्षांची... अल्पवयात स्मार्टफोन हातात आल्याने सोशल मीडियावरही खाते उघडले गेले. चार महिन्यांपूर्वी इन्स्‍टाग्रामवर आली. त्‍यानंतर कुणाशी तरी चॅटिंग सुरू केले. काहीच दिवसांत तिच्यात मोठे बदल होऊ लागले. तिने हेअरस्‍टाइल बदली, कपड्यांची स्‍टाइल बदलली... घरच्यांना ही बाब लक्षात आली. त्‍यांनी तिला नीट राहण्याचा सल्ला दिला... पण तिने स्वतःची बॅग भरली अन्‌ घरच्यांची नजर चुकवून पसार झाली... ही घटना मॉडर्न सिटी समजल्या जाणाऱ्या  मुंबई, पुण्याची नाही तर भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पिंपळगावची आहे. आई-वडिलांना चिंतन करायला लावणारी ही घटना ११ डिसेंबरला उजेडात आल्यानंतर लाखनी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार देण्यात आली आहे.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी काव्या (अल्पवयीन असल्याने नाव बदलले आहे.) पिंपळगाव येथील इंग्रजी शाळेत नववीत शिकते. ऑनलाइन शिक्षणासाठी घरच्यांनी तिला मोबाइल घेऊन दिला होता. चार महिन्यांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर अकाउंट उघडले. त्यानंतर ती तासन्‌ तास कुणाशी तरी चॅटिंग करू लागली. याचदरम्‍यान तिचे बोलणे, वागणेही बदलले. ही बाब घरच्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्‍यांनी तिला रागावले होते. त्यानंतर तिला कुणासोबत तरी फोनवर बोलत असल्याचे घरच्यांनी बघितल्याने तिची समजूत काढली होती.

११ डिसेंबर रोजी ती ब्युटी पार्लरमधून केसांची वेगळीच हेअरस्टाईल करून आली. तेव्हा तू नीट रहा, असे म्हणत तिची आई तिच्यावर रागावली होती. त्यानंतर आई घरकामात व्यस्त असताना काव्या अचानक गायब झाली. तिचा शोध सुरू केला असता ती बॅग घेऊन जाताना दिसल्याचे शेजारच्यांनी सांगितले. त्यामुळे तिचा नातेवाइक, मित्र परिवार सगळीकडे शोध घेऊनही ती मिळून आल्याने वडिलांनी लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गोऱ्या रंगाची, पाच फूट उंचीची, अंगात निळ्या रंगाचा टॉप व जीन्स अशा वर्णनाची माझी मुलगी तिचा मोबाइल अन्‌ घरातील शाळेची कागदपत्रे घेऊन गायब झाल्याचे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी यप्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.