नोकरीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करत शिक्षिकेवर लैंगिक अत्‍याचार!

 
नागपूर : शाळेत नोकरी लावून दिल्याचा मोबदला म्हणून विवाहित शिक्षिकेवर युवकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना नागपुरात समोर आली आहे. आश्रम शाळेत शिकविणाऱ्या ३४ वर्षीय शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोशन अशोक खोडे (३८, रा. नर्मदा कॉलनी, नागपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन आणि शिक्षिकेची बालपणापासून ओळख आहे. दोघेही एकाच शाळेत शिकत होते. रोशन आरटीओ कार्यालयात दलालीचे काम करतो. २ वर्षांपूर्वी आरटीओ कार्यालयात तिची आणि रोशनची भेट झाली होती. रोशनने तिला लायसन्स काढायला मदत केली होती. तेव्हा रोशनने तिची विचारपूस केली असता आर्थिक अडचणीत असल्याचे तिने सांगितले होते.

त्यानंतर रोशनने ओळखीतून तिला एका आश्रम शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळवून दिली. त्यानंतर दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे वाढले. त्यानंतर नोकरी मिळवून देण्याचा मोबदला म्हणून त्याने शरीरसुखाची मागणी केली. मात्र तिने नकार दिला असता त्याने नोकरीवरून काढण्याची धमकी दिली व जबरदस्ती तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर वारंवार तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. यासाठी तो तिला हॉटेल व लॉजवर घेऊन जात होता.

अखेर त्रास असह्य झाल्याने तिने संबंध ठेवण्यास नकार दिला असता रोशनने तिच्या पती व मुलांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली व पुन्हा बळजबरी संबंध ठेवले. दोन दिवसांपूर्वी तिने संबंधाला नकार दिला असता रोशनने तिला बेदम मारहाण केली. अखेर तिने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली.