State News : "त्‍या' डबक्यातील पाण्याने म्‍हणे आजार होतात बरे...लोकांची तोबा गर्दी उसळली!; लातूर जिल्ह्यातील प्रकार

 
file photo
लातूर : लातूर जिल्ह्यातील उजनी भागात सध्या अफवेचा आणि अंधश्रद्धेचा बाजार भरलाय. डबक्यातील पाण्याने असाध्य आजार बरे होत असल्याची अफवा कुणीतरी पसरवली तेव्हापासून लोकांनी डबक्यातील त्या पाण्यासाठी गर्दी करणे सुरू केले आहे. रोज दोनशे ते अडीचशे लोक त्या डबक्यातील पाणी नेण्यासाठी गर्दी करतात.

औसा तालुक्यातील एकंबीवाडीतील वनविभागाच्या हद्दीत असलेल्या डबक्यातील पाणी पिल्याने दमा, कॅन्सर, मधुमेह, मुतखडा असे आजार बरे होत असल्याचा दावा स्थानिक लोक करीत आहेत. वनविभागाच्या ११० एकर क्षेत्रात विविध जातींची मोठमोठी झाडे आहेत. त्यात आयुर्वेदात महत्त्व असलेल्या झाडांचाही समावेश आहे. याच भागात हे डबके आहे.या डबक्यातील पाण्यात परिसरातील झाडांच्या मुळाचा रस मिसळतो. त्यामुळे हे पाणी पिल्याने दवाखान्यात जायची गरज पडत नाही.

सर्व आजार बरे होतात, अशी अफवा कुणीतरी पसरवली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून  टाका, उजनी, बिरवली, पाडोळी, कोंड, जगजी यासह आसपासच्या ५० गावातील नागरिक हे पाणी नेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. एवढेच नव्हे तर सोलापूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातही नागरिकांनी सुद्धा या डबक्यातले पाणी नेले आहे. दरम्यान या डबक्याभोवती नागरिकांनी आता दगडाचे कठडेही  बांधले आहे.

या पाण्यामुळे आजार कमी होत असल्याचा दावा केला जात असला तरी याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे लातूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रायपुरेंनी सांगितले. तपासणी केल्यानंतर पाणी पिण्यासाठी योग्य की अयोग्य ते कळेलच. मात्र नागरिकांनी अफवा व भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ आर. एस. देवणीकर यांनी केले आहे.