STATE NEWS पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात! मुख्यमंत्र्यांच्या मुलासाठी घेणार प्रचारसभा; मुंबईत रोड शोचे आयोजन

 
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): लोकसभा निवडणुकीत पुढील टप्प्यात महाराष्ट्रातील काही मतदारसंघात मतदान होणार आहे. २० मे ला महाराष्ट्राला शेवटचा टप्पा असणार आहे. महाराष्ट्रातून अधिकाधिक जागा मिळवण्यावर महायुतीचा जोर आहे, त्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. आज १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येत असून कल्याण आणि दिंडोरी येथे ते जाहीर सभांना संबोधित करणार आहेत मुंबईत एक रोड शो देखील करणार आहेत.
२० मे रोजी महाराष्ट्रात ६ मतदारसंघात मतदान होणार आहे. ठाणे, कल्याण भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे आणि पालघर या मतदार संघासाठीचा प्रचार १८ मे रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतो २ जाहीर सभा आणि १ रोड शो असा त्यांचा कार्यक्रम असणार आहे.
   भाजपने दिलेल्या माहितीनुसार दुपारी दिंडोरी येथे जाहीर सभा, सायंकाळी कल्याण येथे जाहीर सभा आणि त्यानंतर उत्तर पूर्व मुंबईत रोड शो असे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे नियोजन आहे. मुंबईत होणाऱ्या रोड शो मधून भाजपा प्रचंड शक्तीप्रदर्शन करणार आहे. विक्रोळी येथून मोदींच्या रोड शो ची सुरुवात होणार असून सुरक्षेच्या कारणास्तव उत्तर मुंबईतील वाहतुकीच्या रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.