राज्यात ओमिक्रॉनबाधितांची संख्या ८ वर!
पुण्यात तब्बल ७ रुग्ण आढळल्याने खळबळ!!
Dec 5, 2021, 21:06 IST
पुणे (पुणे लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ८ वर गेली आहे. कल्याण डोंबिविलीत काल एक रुग्ण आढळून राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला होता. त्यानंतर आज, ५ सप्टेंबरला पुणे शहरात १ आणि पिंपरी चिंचवडमध्ये ६ असे एकूण ७ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले. पुणे जिल्ह्यातील रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने या संदर्भात सायंकाळी अधिकृत माहिती दिली.
पुणे शहरातील रुग्ण १८ ते २५ नोव्हेंबर दरम्यान फिनलँडला गेला होता. २९ नोव्हेंबरला ताप आला म्हणून त्याची चाचणी केली तेव्हा तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. त्याच्यात ओमिक्रॉनचा व्हेरिएंट आढळला. नायजेरियातील लेगॉस शहरातून भावाला भेटायला ४४ वर्षांची महिला आली असून, सोबत तिच्या दोन मुली आहेत. या तिघींसह पिंपरी चिंचवडमधील तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे ६ जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यांच्या नमुन्यातही ओमिक्रॉन विषाणू सापडला. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) आज संध्याकाळी हा अहवाल दिला. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. राज्यभर खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.