मुंबई हादरली..!; २० वर्षीय तरुणीची बलात्‍कार करून हत्‍या

 
मुंबई ः राज्‍यातील बलात्‍काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून, महिला-मुली सुरक्षित नसल्याचेच दिसून येत आहे. आज, २७ नोव्‍हेंबरला सकाळी मुंबईच्या कुर्ला परिसरातील एचडीआयएलच्या कंपाउंडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. या तरुणीवर आधी बलात्‍कार करण्यात आला. नंतर मारून या ठिकाणी फेकण्यात आले.
काही तरुण या इमारतीवर इन्स्टाग्रामसाठी व्हिडिओ शूट करायला गेले, तेव्हा ही घटना समोर आली. तरुणीची ओळख अद्याप पटलेला नाही. मुंबई आणि राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यात तिचे छायाचित्र पाठवून ओळख पटविण्यात येत आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्‍थळी आले. त्‍यांनी मृतदेह राजावडी रुग्णालयात पाठवला. डॉक्टरांच्या अहवालानंतर तिच्यावर हत्‍येपूर्वी अमानुष पद्धतीने बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
दरम्‍यान, भाजपच्या चित्रा वाघ यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे. मुंबईत कुर्ला इथं तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आलीय... तिचा मृतदेह अजूनही बेवारस पडून आहे... महिलांच्या सुरक्षिततेसाठी ओळखली जाणारी मुंबई आता ‘जंगलराज’च्या वाटेवर आहे, असे शरसंधान त्‍यांनी राज्य सरकारवर साधले आहे.