साडेसात तासांपेक्षा कमी झोप म्हणजे स्मरणशक्तीची माती!, होऊ शकतो अल्झायमर्स...!!
Updated: Dec 21, 2021, 13:49 IST
मुंबई ः आवश्यकतेपेक्षा कमी आणि आवश्यकतेपेक्षा जास्त झोप घेणे दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी हानीकारक आहेत. असे करणाऱ्या लोकांमध्ये आकलन क्षमतेची कमतरता येते, असा दावा वाशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी संशोधनाअंती केला आहे. युनिव्हर्सिटीचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. ब्रेडेन लुसी म्हणतात, की अर्धवट झोप किंवा झोप येत नसेल तर त्याचा परिणाम थेट मेंदूवर होतो.
मेंदूवर होणाऱ्या या परिणामामुळे विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे अनेक गोष्टींचे विस्मरण होण्याची शक्यता असते. कमीत कमी साडेसात तास झोप ही आरोग्यासाठी आवश्यक आहे. साडेसात तास झोपल्याने विस्मरणाचा आजार होण्याची शक्यता कमी असते.
झोप येत नसेल तर...
झोप येत नसेल तर कोमट दूध पिल्याने चांगली झोप येते, असा दावा संशोधकांनी केला आहे. दुधात ट्रीफ्टोफन नावाचे अमिनो ॲसिड असते. त्यामुळे तणाव कमी होऊन चांगली झोप लागण्यास मदत होते.
झोप आणि अल्झायमर्स...
संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, अपूर्ण झोप आणि अल्झायमर्सचा सरळ संबंध आहे. कमी झोपेमुळे लक्षात न राहणे, भ्रम होणे तसेच नवीन गोष्टी समजून घेताना अडचण येणे हे अल्झायमर्सचे लक्षण आहे. या आजारापासून वाचायचे असेल तर कमीत कमी साडे-सात तास झोप आवश्यक आहे.