तुझ्याशी शेवटचे बोलायचेय, भेटायला ये... प्रेयसीला ही भेट पडली महागात!
नागपूर : प्रेमात धोका दिल्याचा राग मनात ठेवून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. नागपुरातील गांधीसागरजवळील एम्प्रेस मॉलमधील चवथ्या माळ्यावर ही घटना उघडकीस आली. फरजाना (२०, रा. गिट्टी खदान, नागपूर) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. मुजाहिद अन्सारी (२२, मोमीनपुरा, नागपूर) असे मारेकऱ्याचे नाव आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, फरजाना व मुजाहिदचे प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र काही दिवसांपूर्वी फरजानाचे दुसऱ्या तरुणासोबत लग्न पक्के झाले होते. तिने धोका दिल्याने मुजाहिद संतापला होता. बुधवारी त्याने फरजानाला फोन केला. तुझ्याशी शेवटचे बोलायचे आहे. भेटायला ये... असे तो तिला म्हणाला. ती त्याला भेटायला आली. मुजाहिद तिला एम्प्रेस मॉलमध्ये घेऊन गेला. चवथ्या मजल्यावर नेऊन एका खोलीत दुपट्ट्याने गळा आवळून तिचा खून केला व घरी गेला.
दरम्यान, फरजाना घरी दिसत नसल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मुजाहिदसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मुजाहिदला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. पोलीस लगेच त्याला घेऊन एम्प्रेस मॉलमध्ये गेले. तिथे चवथ्या मजल्यावर फरजानाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मुजाहिदविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.