बायकोला सोडू शकतो, पण तिला नाही....नवरा- बायकोचा पोलीस ठाण्यातच राडा!
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, एका तरुणाचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांना दोन मुलेही आहेत. मात्र त्याचे एका दुसऱ्याच महिलेसोबत लफडे असल्याचा पत्नीचा आरोप होता. नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत अश्लील चॅटिंग करताना तिने अनेकदा पकडल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे दोघा पती- पत्नीत घरात अनेकदा भांडणे होत होती. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी जात पंचायतीच्यासुद्धा अनेकदा बैठकी झाल्या.
मात्र तिच्या नवऱ्याचे लफडे सुरूच होते. दोन दिवसांपूर्वी तिचा नवरा त्याच्या प्रेयसीला भेटायला जात असल्याचे तिला कळाले. बायकोने त्याला प्रचंड विरोध केला. दोघांमध्ये मारपीट झाली. घरातले भांडण पोलीस ठाण्यात पोहोचले. विवाहित महिलेने पोलिसांना पतीचा कारनामा सांगितला. त्यानंतर पतीला पोलिसांनी विचारणा केली असता मी हिला सोडेल पण तिला सोडू शकत नाही... असे स्पष्ट उत्तर दिले. ठाण्यातला आवाज एेकून ठाण्यात मोठी गर्दी जमा झाली. अखेर बायको घटस्फोट द्यायला तयार झाली. पोलिसांनी घटस्फोटाची याचिका न्यायालयात दाखल करण्याचा सल्ला देऊन दोघांना घरी पाठवले.