देवेंद्र फडणवीसांचा उत्तर भारत विजयात सिंहाचा वाटा! ४ राज्यांत घेतलेल्या २३ प्रचारसभा आणि रोड-शोंपैकी १४ ठिकाणी विजय पताका;

राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसांवर शिक्कामोर्तब झाल्याची भाजपमध्ये चर्चा
 
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमधल्या भाजपच्या विजयाचे शिल्पकार म्हणून महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढे येतंय. फडणवीसांनी ४ राज्यांत घेतलेल्या २३ प्रचारसभा आणि रोड-शोंपैकी १४ ठिकाणी भाजप उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे बिहार, गोवा राज्यांमध्ये प्रचाराची कमाल दाखवलेल्या फडणवीसांनी उत्तर भारतात पुन्हा एकदा आपल्या नेतृत्व कौशल्याची चुणूक दाखवल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. 
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने विजयाची मुहूर्तमेढ रोवली असून कॉंग्रेसचं पानिपत केलंय. तेलंगणामध्ये कॉंग्रेसने विजय मिळवलाय. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांनी झंजावाती दौरे केले होते. त्यांनी ज्या - ज्या भागात प्रचार दौरे केले तिथली आणि त्या राज्याच्या मतदानाची टक्केवारी वाढल्याचं पुढे आलंय. 
निवडणूक स्पेशालिस्ट
गेल्या काही वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक स्पेशालिस्ट ही ओळख पुढे आलीय. भाजपने यापूर्वी त्यांच्यावर बिहार, गोवा, कर्नाटक आणि आता मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा या राज्यांमध्ये प्रमुख प्रचारक म्हणून नियुक्त केलं होतं. यात पक्षाने दिलेल्या जबाबदारीचं शिवधनुष्य पेलत त्यांनी मोठी कामगिरी केली. बिहारमध्ये नितीशकुमारांच्या पक्षापेक्षाही जास्त जागा मिळवल्या. तर, गोव्यात ऐतिहासिक काम करत एकहाती सत्ता खेचून आणली. सध्याच्या निकालांनंतर देशातल्या राजकारणात आश्वासक नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस पुढे येत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. 
इथे झाला प्रचार अन् विजय..
 
देवेंद्र फडणवीस यांच्या ४ राज्यात सभा आणि भाजपा विजयी झालेल्या जागांची माहिती पुढे आली आहे. मध्यप्रदेशात एकूण ८ मतदारसंघात त्यांचे झंझावाती दौरे झाले. यात धार, इंदोरचे ३ मतदारसंघ, महू, बुरहाणपूर असे मतदारसंघ ६ भाजपने जिंकले. राजस्थानमध्ये फडणवीसांनी प्रचार केलेल्या एकूण ६ मतदारसंघांपैकी केसरी, नासिराबाद, अजमेर उत्तर, सांगानेर अशा ४ जागा भाजपला मिळाल्या. तर छत्तीसगढमध्ये त्यांनी प्रचार आणि रोडशो ५ मतदारसंघात केले. यापैकी रायपूर दक्षिण, रायपूर उत्तर, रायपूर पश्चिम, रायपूर ग्रामीण इथे भाजप विजय साकार केला. तेलंगणामध्ये मात्र, ४ ठिकाणी प्रचार करूनही एकाही ठिकाणी भाजपला विजय मिळवला नाही. 
 विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीसांचं कार्ड प्रभावीपणे चालत असल्याचं लक्षात आल्याने केंद्रीय भाजपने त्यांना पुढे केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.