SPECIAL रक्षाबंधनावर "भद्रा" चे सावट? जाणून घ्या रक्षाबंधनाचा योग्य मुहूर्त कोणता....

 
रक्षाबंधन
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज,१९ ऑगस्टला बहिण भावाच्या प्रेमाचा संदेश देणारा रक्षाबंधन सण देशभरात साजरा करण्यात येणार आहे. श्रावण महिन्यातल्या शुक्लपौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येतो. बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. दरम्यान आज रक्षाबंधन सणावर भद्राकाळाचे सावट आहे. त्यामुळे भद्राकाळ म्हणजे काय? रक्षाबंधनाचा योग्य मुहूर्त कोणता हे आपण जाणून घेणार आहोत..
 काल,१८ ऑगस्टच्या दुपारी २ वाजून २१ मिनिटांनी भद्राकाळ सुरू झाला आहे. आज १९ ऑगस्टच्या दुपारी १ वाजून २४ मिनिटांपर्यंत भद्राकाळ असणार आहे.
राखी बांधण्याचा शुभमुहूर्त...
 आज दुपारी १ वाजून २४ मिनिटापर्यंत भद्राकाळ असणार आहे. त्यामुळे भद्राकाळात राखी बांधू नये. रक्षाबंधन साजरा करण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी १ वाजून २६ मिनिट ते सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत आहे. 
भद्राकाळ म्हणजे काय?
पंचांगाची वार, तिथी, योग, नक्षत्र आणि करण अशी ५ अंगे असतात. कालगणनेसाठी या ५ अंगांचा विचार केला जातो. त्याचबरोबर सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी याचाही बोध पंचांगातून होतो.याच ५ अंगाशी करण आणि भद्राकाळचा संबंध आहे. करण ११ असतात, त्यापैकी एक म्हणजे "विष्टी" करण. ज्या दिवशी विष्टी करण असतो त्या दिवशी भद्राकाळ असतो. या काळात गृहप्रवेश, तीर्थयात्रा, विवाह, नवीन कामे , मंगल कार्य तसेच कोणतीही शुभ कार्य करू नये असे ज्योतिष शास्त्र सांगते. भद्रा काळात भगवान शंकराची आराधना करणे श्रेष्ठ समजले जाते.