मुख्यमंत्रीपदाचा चार्ज स्वीकारण्याबद्दल अजित पवार म्हणतात...
Updated: Dec 29, 2021, 15:30 IST
मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गैरहजर राहिले. त्यावर मुख्यमंत्री पदाचा चार्ज कुणाकडे तरी सोपवायला हवा होता, अशी टिप्पणी विरोधकांनी केली होती. त्यावर आज, २९ डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, की चार्ज कोणी द्यायचा अन् कोणी घ्यायचा ते आमच्यात आम्ही ठरवू. बाहेरच्यांनी उगीच त्यात नाक खुपसू नये, असा टोला त्यांनी लगावला.
आजारी असल्यावर गैरहजर राहणे स्वाभाविक आहे. पण पदभार कुणाला तरी द्यावा लागतो. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असणे स्वाभाविक आहे. कारण पदभार घेतल्यावर ते सोडणार नाहीत. त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार दिला पाहिजे. मुलावरही विश्वास नसेल तर रश्मी वहिनींना चार्ज देऊन मुख्यमंत्री करता येऊ शकतं, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. अजित पवार यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी सोपवायला हवी होती, असेही विरोधकांनी म्हटले होते. त्यावर अजित पवारांनी आज मौन सोडले. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात येऊन अधिवेशनापूर्वी पाहणी केली होती. अखेरच्या दिवशी ते येणार होते. पण कोरोनामुळे आम्हीच त्यांना न येण्याची विनंती केली, असे पवार यांनी सांगितले.