राजकीय वगनाट्याचा आजचा अंक मजेशीर!; राऊत ईडीचा मोठा घोटाळा बाहेर काढणार!
Feb 19, 2022, 16:42 IST
मुंबई ः संजय राऊत, नारायण राणे, इंडी, विनायक राऊत, किरिट सोमय्या अशी पात्रे असलेल्या राजकीय वगनाट्याचा आज, १९ फेब्रुवारीचा अंक जरा जास्तच मजेशीर असल्याचे दिसून आले. सकाळी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांवर हल्लाबोल केला. त्यावर विनायक राऊत यांनी राणेंवर आरोपांचे बॉम्बगोळे फेकले. त्यानंतर राऊत पुन्हा रणांगणात उतरले आणि थेट ईडीलाच आव्हान दिलं. पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वांत मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
ईडीचे अधिकारी मोठ्या घोटाळ्यात सामील असून, त्याचा भंडाफोड लवकरच करणार आहे. आम्हाला चौकशांची भीती दाखवू नका. तुमच्याही कुंडल्या आमच्या हातात आहेत, असे राऊत किरिट सोमय्यांना उद्देशून म्हणाले. सोमय्यांचा एक मोठा प्रोजेक्ट पालघर जिल्ह्यातील एका गावात सुरू असून, त्याची किंमत २६० कोटी रुपये आहे. सोमय्यांचा मुलगा नील, पत्नी मेधा या प्रकल्पाच्या संचालक असून, ईडीचा एक अधिकारीही यात सहभागी आहे. यांच्याकडे इतके कोटी येतात कुठून?, असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.