महागड्या भेटवस्तू देऊन अन् फिरायला नेऊन कंटाळला... डिमांड संपत नसल्याने प्रेयसीला डोंगरावरून दिले ढकलून!; हत्येप्रकरणी प्रियकराला अटक
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पिंकी २४ डिसेंबरपासून बेपत्ता होती. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी याचा तांत्रिक पद्धतीने तपास करीत होते. तपासादरम्यान पिंकीचा झिको हा प्रियकर असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. आधी तो पोलिसांना काहीच माहिती देत नव्हता. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. पिंकी त्याची जुनी मैत्रीण होती. दोघांमध्ये प्रेमाचे संबंध होते.
पिंकी सतत त्याला महागडे गिफ्ट आणि बाहेर फिरायला न्यायची मागणी करत होती. अनेकदा त्याने महागडे गिफ्ट तिला दिले होते. मात्र सतत तिची मागणी वाढत असल्याने तो वैतागला होता. दरम्यान झिकोचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू झाले होते. त्यामुळे पिंकीचा त्रास संपवायचा असे त्याने ठरवले. २४ डिसेंबर रोजी दोघे स्कुटीवरून फिरायला गेले. पिंकीच्या वागण्यावरून दोघांत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर त्याच रात्री झिकोने त्याच्या मित्राच्या मदतीने पिंकीला जेट्टी परिसरातील डोंगरावरून ढकलून दिले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर झिकोने त्याची स्कूटी मित्राला घेऊन जायला सांगितलं. तो दुसऱ्या मित्राच्या गाडीवरून घरी निघून गेला, असे झिकोने पोलिसांना सांगितले. दरम्यान पोलिसांना पिंकीचा मृतदेह कुजलेल्या आणि गळ्यात दगड बांधलेल्या अवस्थेत घटनास्थळी मिळून आला आहे.