मॅनेजरने प्रेमाच्या जाळ्यात अडकवली आयटी इंजिनियर तरुणी!; लैंगिक शोषण केले!! म्हणे, पहिल्या पत्नीला सोडून तुझ्याशी लग्न करतो
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय तरुणी गुजरातमधील अहमदाबादची आहे. ती आयटी इंजिनियर असून, पुण्यात एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीवर होती. कंपनीचा मॅनेजर राहुल कुमार सिंह (३७, खराडी, पुणे) याच्याशी तिची ओळख झाली. एकाच कंपनीत असल्याने रोज भेटणे आणि बोलणे व्हायचे. मॅनेजर राहुलने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकले आणि ती त्यात अलगद अडकली. राहुलचे आधीच लग्न झाले होते. त्यामुळे पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन मी तुझ्याशी लग्न करेल, असा शब्द राहुलने तिला दिला.
त्यानंतर तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनंतर पीडित तरुणीने राहुलला लग्नाबद्दल विचारणा केली. तेव्हा त्याने त्याचा मित्र मालव आचार्य (रा. अहमदाबाद) याच्यासोबत मिळून तिची बदनामी सुरू केली. कंपनीत व तरुणीच्या राहत्या ठिकाणी तिची बदनामी करून तिला पुन्हा गुजरातला जाण्यास भाग पाडले, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तू जर पोलिसांत तक्रार दिली तर इतरांना तुझ्यावर बलात्कार करायला सांगेन. तुझा अपघात घडवून आणेन, अशा धमक्या राहुलने तिला दिल्या. त्रास असह्य झाल्याने तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून मॅनेजर राहुल व त्याचा मित्र मालवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.