शिक्षकाचा दहावीतील मुलीवर वर्षभर लैंगिक अत्‍याचार!; प्रेग्‍नंट राहिल्याचे बिंग फुटले!!

 
मुंबई : व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. पीडित मुलीची अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वर्षभरात वारंवार तिचे शोषण केले. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिला धमकावून गप्प राहायला सांगितले. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी खासगी डॉक्टरकडून तिची प्रसुती करून घेत बाळाची विल्हेवाटही लावली. नंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी सध्या दहावीत आहे. २०१८ मध्ये मुलीच्या आईची ओळख जसप्रीत सिंग सोधी याच्याशी झाली होती. मुंबईतील मालाड भागात राहणारा सोधी मुलीच्या घरी जाऊन तिला व तिच्या लहान भावाला व्यक्तिमत्व विकासाचा विषय शिकवत होता. २०२० मध्ये सोधी हा उलवे भागात राहायला आला होता. घराचे सामान लावण्यासाठी त्याने मुलीला व तिच्या भावाला बोलावले होते. त्यावेळी मुलगी त्याच्या घरात झोपलेली असताना त्याने तिचे अर्धनग्न फोटो काढले.

त्यानंतर ते पीडित मुलीला दाखवून व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तो वर्षभर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत राहिला. गेल्या डिसेंबरमध्ये तिचे पोट दुखू लागल्याने तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. मुलीच्या आई- वडिलांना ही बाब माहीत झाल्यानंतर त्यांनी खासगी डॉक्टरकडून तिची प्रसुती करवून घेतली. मात्र बाळाचा मृत्यू झालेला होता. मुलीच्या कुटुंबियांनी दोन दिवसांपूर्वी पोलिसांत या प्रकरणाची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे.