असाही पुष्पाचा फिव्हर... १० वीच्या विद्यार्थ्याने पेपरात सर्वपल्ली ऐवजी लिहिले "श्रीवल्ली'
सध्या दहावीचे सराव पेपर सुरू आहेत. कोरोनामुळे ऑनलाइन आणि ऑफलाइन या भानगडीत विद्यार्थी शिक्षणापासून जरा लांबच गेल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या काळात कधी नव्हे तितकी मोबाइल हाताळण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. इंटरनेट असल्याने वेबसीरिज, इन्स्टाग्रामवरील रिल्स, फेसबुकचे विद्यार्थ्यांना वेड लागले. कधी नाही तेवढे चित्रपट विद्यार्थ्यांनी कोरोनाकाळात मोबाइलवर बघितले असतील. त्यातच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या साऊथच्या पुष्पाची लोकप्रियता भारीच आहे.
चित्रपटातील गाण्यांनी अक्षरशः साऱ्यांना वेड लावले. गाण्यावरील छोटे छोटे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. फलटण तालुक्यातील एका शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याला चित्रपटाची चांगलीच भुरळ पडली. सराव पेपरात त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन असे लिहायचे होते. मात्र पुष्पाच्या प्रभावाने त्याने चक्क श्रीवल्ली असे लिहिले. त्याच्या शिक्षकांनी पेपर तपासल्यानंतर ही चूक त्याच्या व पालकांच्या निदर्शनास आणून दिली. पालकवर्ग सुद्धा मुलांच्या अशा वागण्याने कंटाळले असून, ऑफलाइन परीक्षा झाल्यास चित्रपट, मोबाइल, गेम, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या नादात अडकलेली मुले १० वी पास होतात की नाही अशी चिंता आता पालकांना सतावत आहे.