धक्कादायक... स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेवर मालकाचा बलात्कार; मॅनेजरनेही साधली संधी

 
जळगाव खानदेश : स्पा सेंटरवर मसाजचे काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेवर स्पा सेंटर मालकाने बलात्कार केला. मॅनेजर व आणखी एका कर्मचाऱ्यानेही संधी साधत विनयभंग केला. जळगाव येथील रिंग रोडवरील स्पा सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितेने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा सेंटरचा मालक दत्तू लक्ष्मण माने आणि मॅनेजर दीपक बडगुजर आणि पंकज जैन अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित महिला हरियाणा राज्यातील रहिवासी आहे. ती रोजगारासाठी जळगावला आली होती. नोव्हेंबर २०२१ पासून ती जळगावातील रिंग रोडवर असलेल्या दत्तू मानेच्या स्पा सेंटरवर मसाज करण्याचे काम करत होती. २४ फेब्रुवारीला दत्तू माने नाशिकवरून जळगावला आला. स्पा सेंटरमध्ये त्याने महिलेकडून मसाज करून घेतली. त्यानंतर महिलेसोबत जबरदस्ती शारीरिक संभोग केला.

घडला प्रकार कुणाला सांगितल्यास उरलेला पगार देणार नाही, अशी धमकीसुद्धा त्‍याने दिली. त्यानंतर मॅनेजर बडगुजर आणि जैन यांनी तिचा विनयभंग केला आणि महिलेला नोकरीवरून काढून टाकले. अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून मानेसह मॅनेजर बडगुजर व कर्मचारी जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.