धक्कादायक.... पुण्यात २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार; आरोपीची पत्नीसुद्धा कारनाम्यात सहभागी
Feb 8, 2022, 16:50 IST
पुणे : माझा घटस्फोट झाला आहे, असे खोटे सांगून एका व्यक्तीने २७ वर्षीय तरुणीशी जवळीक वाढवली. तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि नंतर तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. विशेष म्हणजे या काळ्या कृत्यात आरोपीच्या पत्नीचा देखील सहभाग होता. पती आणि तरुणीच्या संबंधाचे ती मोबाइलमध्ये शूट घेत होती. पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, तक्रारीवरून विशाल गायकवाड (४७) व त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघे पती- पत्नी पुण्यातील कोंढवा परिसरातील पॅराडाईज व्हीला येथील रहिवासी आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आणि पीडित तरुणीची २०१८ मध्ये ओळख झाली होती. तरुणीच्या व्यवसायात गुंतवणूक करायची आहे असे सांगत विशालने तिच्याशी जवळीक साधली. माझा घटस्फोट झाला आहे, असे खोटे सांगून तिला लग्नाचे आमिष दाखवले. माझी पत्नी पैसे मिळवण्यासाठी माझ्यासोबत राहते, अशी खोटी माहिती विशालने तरुणीला दिली. त्यानंतर २ फेब्रुवारी २०२२ पर्यंत टर्फ क्लब हाऊस, कॅम्प व पाषाण येथील त्याच्या घरी त्याने अनेकदा तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान विशालची पत्नी त्यांच्या शारीरिक संबंधाच्या प्रसंगाचे शूटिंग मोबाइलमध्ये करत होती. तू माझ्यासोबत राहिली नाही तर जीवे मारेन, अशी धमकी विशालने तरुणीला दिली. दरम्यान तरुणीचे लग्न झाल्यानंतर विकृत जोडप्याने त्यांचे त्या खासगी प्रसंगाचे फोटो तरुणीच्या नवऱ्याला पाठविले आणि बदनामी केली, असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.