अनमॅरिड असल्याचे सांगून तिला भुरळ!; वारंवार लैंगिक अत्‍याचार, सत्य समोर आल्यावर म्‍हणाला, दोघींना सांभाळतो!

 
पुणे  ः विवाहित असूनही ३५ वर्षीय महिलेला अविवाहित असल्याचे खोटे सांगून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिच्यावर वारंवार लैंगिक अत्‍याचार केला. मंदिरात तिच्यासोबत लग्न केले. नंतर तो विवाहित असल्याचे तिच्या समोर आले. त्‍यामुळे फसवणूक केल्याची तक्रार तिने पुण्याच्या चिखली पोलीस ठाण्यात केली आहे. पीडिता टेलिकॉलर असून, कर्ज योजनेची माहिती ग्राहकांना देण्यासाठी तिची नियुक्‍ती खासगी कंपनीत होती. चिखलीच्या मोरेवस्तीत हा प्रकार २०१५ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत घडला.

महेश दिनकर इंदलकर (४१, रा. लोहगाव, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिलेचे पहिले लग्न झाले असून, ती एका खासगी कंपनीत टेलिकाॅलर म्हणून नोकरी करत होती. कर्ज देण्यासाठी ग्राहकांना संपर्क करून ती माहिती द्यायची. यातूनच तिने महेशला कॉल केला होता. या कॉलमुळे दोघांत ओळख झाली. महेशने कर्जाबद्दल उत्‍सुकता दाखवत तिच्याशी ओळख वाढवली.

तो एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. दोघांच्या भेटीगाठी होऊन त्‍याने तिच्याकडे प्रेम व्यक्‍त केले. पीडितेने त्‍याला माझे लग्न झाले आहे, असे सांगितले. तरीही तो पिच्छा पुरवत राहिला. यातून तीही त्‍याच्या भाळली. त्‍याने तिला विवाहित असल्याचे सांगितलेच नाही. त्‍याने संधी मिळताच तिच्याशी शरीरसंबंध ठेवायला सुरुवात केली. नंतर दोघांनी मंदिरात लग्नही केले. तेव्हाही त्‍याने विवाहित असल्याचे स्‍पष्ट केले नाही.

लग्न झाल्यावरही वारंवार तो लैंगिक अत्‍याचार करत राहिला. पण त्‍याने पहिली पत्नी असल्याचे सांगितले नाही. मात्र एकेदिवशी तो पकडला गेला तेव्हा त्‍याने पहिल्या पत्नीसोबत तुलाही सांभाळतो, असे खोटे आश्वासन दिले. शारीरिक संबंधाची हौस झाल्यावर तिला तो टाळू लागला तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव तिला झाली. तिने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे करीत आहेत.