एकदा I LOVU YOU म्हणणे म्हणजे विनयभंग नाही!; विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय

 
मुंबई : एखाद्या अल्पवयीन मुलीला I LOVE YOU म्हणणे म्हणजे विनयभंग होऊ शकत नाही. त्या शब्दांवरून स्वतःच्या प्रेमभावना व्यक्त करता येतात. त्यात मुलीचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा हेतू दिसत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून विशेष पोक्सो न्यायालयाने २२ वर्षीय तरुणाची विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

२०१६ मध्ये याप्रकरणी एका १७ वर्षीय मुलीच्या आईने तक्रार दिली होती. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला तेव्हा ती शौचाला जात असताना त्याने तिला आय लव्ह यू म्हटले होते, असे तिने पोलिसांना सांगितले होते. तो माझ्या मुलीकडे पाहून डोळे मिचकावत होता, असे मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले होते. मात्र डोळे मिचकावत असल्याबद्दल मुलीने काहीही पोलिसांना सांगितले नव्हते.

प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर यावर सुनावणी झाली. तरुणाने तिला फक्त एकदाच आय लव्ह यू म्हटले, अशी मुलीची तक्रार आहे. तो तिचा सतत पाठलाग करत होता किंवा सतत आय लव्ह यू म्हणत होता, अशी मुलीची तक्रार नाही. एकदा आय लव्ह यू म्हणणे म्हणजे स्वतःचे प्रेम व्यक्त करणे आहे. हा विनयभंग ठरू शकत  नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. आय लव्ह यू म्हणण्या व्यक्तिरिक्त तरुणाने दुसरे काहीच केले नाही. तसे पुरावेसुद्धा पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केले नाही. त्यामुळे मुलीच्या शेजारी राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.